Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता अशी आणखी प्रकरणं समोर येत आहेत. एका 19 वर्षाच्या तरुणीवरही सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला होता. मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला हिंसाचार उफाळल्यानंतर अनेकांनी आपला जीव वाचवण्याच्या हेतूने पळ काढला होता. त्यावेळी या 19 वर्षीय आदिवासी तरुणीनेही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी ती एका एटीएममध्ये जाऊन लपली होती. पण यावेळी एका गटाने तिचं अपहरण केलं आणि लैंगिक अत्याचार केले. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तरुणाने सगळा घटनाक्रम उलगडला आहे.
तरुणीने आरोप केला आहे की, तिला डोंगर परिसरात एका ठिकाणी नेण्यात आलं होतं. तिथे तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिला बंदुकीच्या मागील बाजूने मारहाण करण्यात आली. तिला अन्न, पाणी काहीच दिलं जात नव्हतं. नंतर 15 मे रोजी तिला एका बंडखोर गटाकडे सोपवण्यात आलं.
"चार जण मला पांढऱ्या बोलेरोमधून घेऊन गेले होते. मला नेलं जात असतानाच ड्रायव्हर वगळता तिघांनी माझ्यावर बलात्कार केला. नंतर मला डोंगरात नेत छळ करण्यात आला," अशी धक्कादायक माहिती तरुणीने दिली आहे.
"जो काही अत्याचार केला जाऊ शकतो, त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. संपूर्ण रात्रभर मला खाण्यासाठी काहीच दिलं नाही. त्यांनी मला पाणीही दिलं नाही. सकाळी वॉशरुमला जाण्याच्या बहाण्याने मी त्यांना बांधलेले हात,पाय सोडण्यास सांगितलं. त्यातील एकजण दयाळू होता. त्याने माझे हात-पाय मोकळे केल्यानंतर मी डोळ्यावरील पट्टी काढून आजुबाजूला काय सुरु आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी तेथून पळून जाण्याचं ठरवलं," असं तरुणीने सांगितलं आहे.
पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसरा, एका रिक्षाचालकाने तरुणीला सुरक्षितपणे जाण्यास मदत केली. फळांमध्ये लपून तिने रिक्षातून प्रवास केला. यानंतर तरुणी कांगपोकपी येथे पोहोचली. तिला नागालँडची राजधानी कोहिमामधील रुग्णालयात पाठवण्यात आलं. 21 जुलैला तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेच्या दोन महिन्यांनी इंफाळमधील पोरोम्पत पोलीस ठाण्यातही सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी धमकी आणि खुनाच्या उद्देशाने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने भेट दिलेल्या पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच जवळपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, तसंच आरोपींची ओळखही पटलेली नाही. पोलिसांनी अद्याप आम्हाला कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी तपास सध्या सुरु असल्याची माहिती दिली आहे. पण तरुणीच्या आरोपींना सिद्ध करणारे पुरावे सापडत नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. तसंच पुरावे नसल्याने पोलीस तरुणीला न्याय देऊ शकतील का? यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.