नवी दिल्ली : नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.
या प्रकरणात दिल्ली सरकारनं शालीमार बाग भागातील मॅक्स रुग्णालयावर कारवाई करत या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिलेत.
दिल्ली सरकारमधली आरोग्य मंत्री सत्येंद्र जतैन यांनी, अशा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचं म्हटलंय. नवजात बालकाला मृत सांगणाऱ्या या रुग्णालायाच्या प्रशासनाला दिल्ली पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती.
३० नोव्हेंबर रोजी या चिमुरड्याचा जन्म झाला होता. या चिमुरड्याच्या आईनं एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन जुळ्यांना जन्म दिला होता... ही दोन्हीही मुलं मृत जन्माला आल्याचं सांगत रुग्णालयानं एका प्लास्टिकच्या पिशवीत दोन्ही अर्भकांना भरून त्यांच्या पालकांच्या हाती सोपवलं होतं. यावेळी रुग्णालयानं बाळाचा ईसीजी काढला नव्हता... त्यामुळे बालकाचा मृत्यू झाला किंवा नाही, हे स्पष्ट झालेलं नसतानाही बालक मृत घोषित करण्यात आलं.
पिशवीत एका बालकाची हालचाल जाणवल्यानंतर आई-वडिलांना आपला मुलगा जिवंत असल्याचं समजलं होतं. या बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, मंगळवारी सायंकाळी पीतमपुरा भागातील एका रुग्णालयात या बाळानं अखेरचा श्वास घेतला.
याआधी, या प्रकरणात मॅक्स रुग्णालयानं महिलेची प्रसुती करणाऱ्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली होती.