बिल नाही तर पैसे नाही, फुकटात जेवण; रेल्वेचा मोठा निर्णय

मार्च २०१९ पर्यंत प्रवाशांच्या नजरेस पडतील अशा खाद्यपदार्थांचे दर असलेला तक्ता लावण्यात येणार आहेत. 

Updated: Jan 5, 2019, 05:44 PM IST
बिल नाही तर पैसे नाही, फुकटात जेवण; रेल्वेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : खिशाला परवडणारे तिकीटदर आणि विना दगदग प्रवाशाची हमी असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वेला पसंती दिली जाते. प्रवासादरम्यान प्रवाशी रेल्वेतील जेवण घेतात. पण खरेदी केलेल्या जेवणाचं बिल कॅटरिंग (पेन्ट्री) कर्मचाऱ्यांकडून दिले जात नाही. यामुळे प्रवाशी-कॅटरिंग कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. या प्रकारचे वाद टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मार्च २०१९ पर्यंत प्रवाशांच्या नजरेस पडतील अशा खाद्यपदार्थांचे दर असलेला तक्ता लावण्यात येणार आहेत. तसेच 'कृपया टीप देऊ नये' या आशयाचा संदेश देखील या तक्त्यावर असणार आहे. कॅटरिंग कर्मचारी हे प्रवाशांना आसनापर्यंत जेवण-खाद्यपदार्थ आणून देतात. यावेळी प्रवाशी त्यांना टीप देतात. हा प्रकार रोखण्यासाठी हा संदेश तक्त्याखाली दिला जाणार आहे.

प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून, आयआरसीटीसी कडून खाद्यपदार्थांचे दर ठरलेले असतात. तरीदेखील मर्जीनुसार रेल्वेतील कर्मचारी हे पैसे उकळतात. या लुटमारीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी, सरकारने आता कंबर कसली आहे. जर प्रवाशांना जेवणाचे बिल दिले नाही तर ते फुकटात मिळेल, असा निर्णय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेतला आहे. रेल्वेतील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पियुष गोयल आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. प्रवाशांना जेवणासंदर्भात असलेली तक्रार दाखल करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात यावा, असे आदेश या बैठकीत पियुष गोयल यांनी दिले. यासाठी जानेवारी २०१९ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करणारे अनेक प्रवाशी हे परराज्यातील असतात. त्यामुळे मोबाईल मध्ये इंटरनेट सेवेच्या अभावाने त्यांची गैरसोय होऊ नये. यासाठी रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधेच्या विस्तारावर भर देण्यात आला आहे. आजमितीस ७२३ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा आहे. पण हा आकडा २००० पर्यंत नेण्याचा मानस रेल्वेमंत्र्यांचा आहे. तसेच रेल्वे स्थानकांवरील वायफाय बसवण्याचे काम जलदपणे पूर्ण करणाऱ्या रेल्वे व्यवस्थापकांना बक्षीस देण्याबद्दल त्यांनी म्हटले आहे.
 
प्रवाशांची लूट टाळण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कॅटरिंग कर्मचाऱ्यांना 'पॉईंट ऑफ सेल' या मशीन वितरीत करण्यात येतील. या मशीनमुळे व्यवहारात पारदर्शकता येईल. तसेच अतिरिक्त पैसे घेणाऱ्या कॅटररविरोधात तक्रार देखील करता येईल.