कान्हूच्या एका आवाजावर १००हून अधिक मोर एकत्र येतात

कान्हू 'पीकॉक मॅन' नावाने ओळखला जातो.

Updated: Oct 19, 2019, 01:01 PM IST
कान्हूच्या एका आवाजावर १००हून अधिक मोर एकत्र येतात title=

कटक : आपल्याला मोर पाहायला मिळणं ही मोठी दुर्मिळ गोष्टच. पण रोज १००हून अधिक मोर एखाद्याच्या सानिध्यात असतील तर? विश्वास नाही ना बसत... पण हे खरं आहे... कटक येथे राहणारा २२ वर्षीय कान्हू याची मोरांसोबत चांगलीच गट्टी आहे. मोरांचा हा सहवास, त्यांचं प्रेम कान्हूला वारसा म्हणूनच मिळालं आहे. कान्हूच्या एका आवाजावर जंगलातील सर्व मोर त्याच्यापर्यंत पोहचतात. कान्हू मोरांना आवाज देत दिवसांतून दोन वेळा खाण्यासाठी बोलवतो. पुढच्या काही मिनिटांतच जंगलातील मोर त्यांच्याकडे येतात. कान्हू त्याचा बराचसा वेळ मोरांच्या देखरेखीसाठी देताना दिसतो. 'पीकॉक मॅन' अशीच कान्हूची ओळख आहे.

१९९९ साली आलेल्या वादळानंतर तीन मोर कुठून तरी उडून या भागात आले होते. पण त्यावेळी कान्हू नव्हता. कान्हूचे आजोबा तेथेच जवळच्या फायरिगं रेंजमध्ये पहारेकरी म्हणून काम करत होते. कुठून तरी उडून आलेल्या त्या तीन मोरांना कान्हूच्या आजोबांनी खाणं देण्यास सुरुवात केली. कान्हूचे प्राणीप्रेमी आजोबा प्राण्यांसोबतच हळू-हळू मोरांवरही तितकाच जीव लागू लागले. मोरांना रोज खायला देणं हे त्यांचं नित्याचच काम झालं.

आज आजोबा नाहीत. पण आजोबांच्या जाण्यानंतर ही मोठी जबाबदारी आता कान्हूने स्वीकारली आहे. कान्हू आजही आजोबांनी दिलेली जबाबदारी शिताफीने पार पाडताना दिसतोय. आज कान्हू केवळ त्या तीन मोरांनाच नाही, तर तब्बल १३३ मोरांना खायला द्यायचं काम करतोय. हे मोर जंगलातील आझाद पक्षी आहेत. पण कान्हूचा आवाज आणि त्याच्या प्रेमाने त्यांना मात्र चांगलीच बंदी केली आहे.