अमेरिका भारताला देणार घातक शस्त्र, आज होणार महत्त्वाचे करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा कळसाध्याय आज लिहिला जाणार आहे.

Updated: Feb 25, 2020, 08:45 AM IST
अमेरिका भारताला देणार घातक शस्त्र, आज होणार महत्त्वाचे करार title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचा कळसाध्याय आज लिहिला जाणार आहे. आज अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. भारत आणि अमेरिका यांच्यात काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. त्यात प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रातल्या करारांचा समावेश आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात आज महत्त्वाचे संरक्षण करार होणार आहे. यात संरक्षण विषयक करार प्रामुख्याने असणार आहेत. काल नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात ट्रम्प यांनी भाषणात त्याचं सुतोवाच केलं. 

भारत आणि अमेरिका यांच्यात तब्बल २१ हजार कोटींचा संरक्षण साहित्य खरेदी करार होणार आहे. या कराराअंतर्गत भारत अमेरिकेकडून एमएच-६० रोमियो मल्टीरोल हेलिकॉप्टर्स आणि अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेणार आहे. रोमियो हेलिकॉप्टर्सची निर्मिती अमेरिकेच्या लॉकहीड मार्टीन कंपनीने केलीय. पाणबुडी आणि मोठ्या जहाजांवर मारा करण्यात ही हेलिकॉप्टर्स तरबेज समजली जातात. तसंच शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा हवेतच निपटारा करणारी अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीमही अमेरिका भारताला विकणार आहे.

अमेरिका काय देणार?

११८ अमाराम म्हणजे अॅडव्हान्स मीडियम रेंज एअर टू एअर मिसाईल
१३४ स्टिंगर एफआयएम ९२ एल मिसाईल
५ सॅटेलाईट रडार सिस्टीम
३ अमाराम गायडेड सिस्टीम
इलेक्ट्रीकल ऑप्टीकल इन्फ्रारेड सिस्टीम
कॅनेस्टर लाँचर, हाय मोबिलीटी लाँचर्स

भारत अमेरिकेकडून अनेक हत्यारं खरेदी करणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काह वर्षात संरक्षण सहकार्य वाढतं आहे. गेल्या १२ वर्षात भारताने अमेरिकेकडून १८ कोटी डॉलर्सचं संरक्षण साहित्य विकत घेतलं आहे. यात अपाचे हेलिकॉप्टर्स, चिनूक हेलिकॉप्टर्स, एम ७७७ हॉवित्झर गन, पी ८ आय लाँग रेंज एअरक्राफ्ट, हारपून मिसाईल सिस्टीम यांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यातला आजचा दिवस हा करार मदारांचा असणार आहे. नेत्यांची मैत्री त्यांच्या जागी. देशाला सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी आता या गळाभेटींचा उपयोग किती होतो ते पाहणं औत्सुक्याचं आहे.