पीएम श्रमयोगी मेगा पेंशन योजनेची घोषणा, दरमहिन्याला मिळणार 3 हजार रुपये

अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

Updated: Feb 1, 2019, 01:46 PM IST
पीएम श्रमयोगी मेगा पेंशन योजनेची घोषणा, दरमहिन्याला मिळणार 3 हजार रुपये title=

Budget 2019, नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत अंतरिम बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. बजेटच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं की, आम्ही 2022 पर्यंत नवा भारत बनवू. या दरम्यान त्यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधनातून मेगा पेंशन योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.

श्रमयोगी मानधन मेगा पेंशन योजना

मेगा पेंशन योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेंशन म्हणून मिळणार आहे. या योजनेसाठी दर महिन्याला तुम्हाला 55 रुपये द्यावे लागणार आहेत. या योजनेचा फायदा रिक्षा चालवणाऱ्या आणि कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला देखील मिळणार आहे. पेंशन योजनेसाठी सरकारने 500 कोटींची तरतूद केली आहे. पेंशन योजनेचा फायदा 10 कोटी लोकांना होणार आहे. पेंशन योजनेची सुरुवात याच वर्षापासून केली जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी नवी योजना

यासोबतच पीयूष गोयल यांनी या बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची देखील घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला 6 हजार रुपये वर्षाला मदत म्हणून दिले जाणार आहे. पीएम शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारने 75,000 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 1 डिसेंबर 2018 पासून मिळणं सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा पहिला हप्ता लवकरच दिला जाणार आहे. योजनेतून वर्षाला 3 वेळ 2-2 हजार रुपये दिले जातील.