'या' शेतकऱ्याचा कांदा 2 वर्ष खराब होत नाही, पाहा कांदा ठेवण्याची पद्धत

पारंपरिक पद्धतीने कांदा साठवल्याने काही कांदा हा खराब होतो.

Updated: Jun 26, 2021, 10:22 PM IST
'या' शेतकऱ्याचा कांदा 2 वर्ष खराब होत नाही, पाहा कांदा ठेवण्याची पद्धत title=

मुंबई : शेतकरी, देशाचा अन्नदाता. शेतात राबराब राबून देशासाठी अन्न पिकवतो. पण शेतकऱ्याला निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा अन्य कारणांमुळे पिकातून उत्पादन खर्चही सुटत नाही. पारंपरिक पद्धतीने केलेली शेती किंवा पिकाची साठवण यामुळे अनेकदा शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतो. पण आधुनिकतेची कास धरलेल्या तसेच प्रयोग आणि परिवर्तन करण्याची इच्छा असेलेले शेतकरी नक्कीच यशस्वी ठरतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. (method of storage of onion by the farmer for a longer period) 

कांदा चाळीत पारंपरिक पद्धतीने कांदा साठवला जातो. सरकारकडून यासाठी अनुदानही दिलं जातं. पण या पारंपरिक पद्धतीने कांदा साठवल्याने काही कांदा हा खराब होतो. तर काही कांद्यांना कोंब फुटतात. त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया जाते. पण यावर एका प्रयोगशील शेतकऱ्याने रामबाण उपाय शोधून काढला आहे, जो की यशस्वी ठरला आहे.  

सुमेर सिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सुमेर हे हरियाणातील भिवानीतील ढाणी माहूत येथे राहतात. ते गेल्या 22 वर्षांपासून शेती करतायेत. शेतकऱ्यांना परवडेल आणि कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा मार्ग यांनी सांगितलाय.

कांदा साठवण्यासाठी काय केलं?

सुमेर सिंग यांच्या शेतात शेड आहे. या शेडमध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवेलेत. सुमेर म्हणतात. "कांदे विक्रीसाठी पोत्यात एकावर एक असे भरले जातात. कांदे उष्ण असतात. त्यामुळे दाबामुळे कांदे खराब होतात. एखादा कांदा जरी खराब असला तरी इतर कांदेही खराब होतात. पण आमच्या साठवणूक पद्धतीमुळे कांदा खराब होण्याची शक्यताच कमी झाली आहे. तसेच जर एखादा कांदा खराब झाला असेल तर ते ही समजू शकेल", असा विश्वास सुमेर सिंग यांनी व्यक्त केला आहे. सुमेर सिंग यांनी सेंद्रीय पद्धतीने कांद्यांचं उत्पादन घेतलं आहे.  

काढणीनंतर सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र बांधले. त्यानंतर ते शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले, ज्याप्रमाणे बाजारात दुकानदार केळी लटकवून ठेवतात. या पद्धतीने कांदे लटकवल्याने ते सुरक्षित राहतात तसेच खराबही होत नाही. त्यामुळे कांदे जास्त काळ टिकतात.

"सुमेर यांच्या या कांदा साठवणीच्या पद्धतीमुळे कांदे अधिक काळ टिकतात. त्यामुळे ते कोरडे होण्यास मदत होते. कांदे कोरडे होताच त्याचे बाहेरील पापुद्रे काढून टाका. त्यानंतर पुन्हा ते लटकवा. या प्रकारे कांदे जवळपास वर्षभर टिकवून ठेवू शकतो", असा काही कृषी तज्ज्ञांचा दावा आहे.

कांद्याला अधिक दर 

सुमेर यांना या पद्धतीने कांदा साठवल्याने प्रति किलो मागे 10 रुपयांचा फायदा झाला आहे. सुमेर म्हणतात, "मी आतापर्यंत प्रति किलो 25 रुपये या दराने  एकूण 25 क्विंटल कांदा विकला आहे. तोच कांदा आता मी 35 रुपये किलो या भावाने विकत आहे. कांद्याची लागवड करण्यासाठी मला 55 हजार रुपये खर्च झाला. कांदा विक्रीतून माझा उत्पादन खर्च निघाला आहे. आता मला फायदा होत आहे.

सुमेर यांचा शेतकऱ्यांना संदेश 

"सेंद्रीय शेती किंवा रासायनिक शेती दोन्ही प्रकारात जोखीम आहेत. पण म्हणून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करायचेच नाहीत, अशातला भाग नाही. सर्व शेतकरी बांधवांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी", असे आवाहन सुमेर यांनी केलं आहे.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x