नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली मेट्रो आता मात्र सर्वसामान्यांचा खिसा खाली करणार आहे. कारण मेट्रोच्या दरात २० ते ३३% वाढ झाली आहे. हे वाढलेले नवीन दर १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पहिल्यांदा मेट्रोचे दर वाढल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत घट झाली होती. तरी देखील डीएमआरसी ने पुन्हा मेट्रोच्या दरात वाढ केली आहे. सध्या मेट्रोचे कमीत कमी भाडे १० रुपये तर जास्तीत जास्त भाडे ५० रुपये इतके आहे. मात्र १ ऑक्टोबरपासून ही किंमत वाढून ६० रुपये होईल.
डीएमआरसी ने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या २ किलोमीटरच्या प्रवासासाठी १० रुपये आणि २-५ किलोमीटरच्या प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी ५ किलोमीटरसाठी १५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच ५ ते १२ किलोमीटरसाठी २० रुपये मोजावे लागत होते. आता ही किंमत ३० रुपये इतकी झाली आहे.
१२ ते २१ किलोमीटरच्या प्रवासासाठी पूर्वी ३० रुपये लागत होते. यात देखील वाढ होऊन ही रक्कम ४० रुपये इतकी झाली आहे. २१ ते ३२ किलोमीटरच्या प्रवासाचे दार देखील वाढले असून त्यासाठी ४० ऐवजी ५० रुपये द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही ३२ किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करत असाल तर तुम्हाला ६० रुपये मोजावे लागतील. जी किंमत आधी ५० रुपये इतकी होती.
दिल्ली मेट्रो रेल्वे निगमच्या एका सर्व्हे मध्ये असे सांगण्यात आले की, प्रत्येक महिन्याला १० ते ३० हजार इतके उत्पन्न असणारे लोक मेट्रोने प्रवास करतात. कारण ते त्यांना परवडण्यासारखे असते. परंतु, पहिल्यांदा वाढवलेल्या मेट्रोच्या वाढत्या दरामुळे प्रवाशांची संख्या कमी झाली होती. आता या संख्येत अधिक घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.