नवी दिल्ली : आपल्याच वायुदलाचे हेलिकॉप्टर पाडणाऱ्या दोन वायुदल अधिकाऱ्यांवर वायुदलाने आजपासून कोर्ट मार्शलची कारवाई सुरू केली आहे. २७ फेब्रुवारीला श्रीनगरजवळ नजरचुकीने वायुदल अधिकाऱ्यांनी आपलेच एमआय १७ हे हेलिकॉप्टर पाडले होते. यात सहा अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
या चुकीला कारणीभूत दोन अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल आणि सहा जणांवर व्यवस्थापकीय कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई होत असलेल्यात दोन एअर कोमोडोर आणि दोन फ्लाईट लेफ्टनंट यांचा समावेश आहे. तर एक ग्रुप कॅप्टन आणि एक विंग कमांडर यांच्यावर कोर्ट मार्शल होणार आहे. वायुदलप्रमुख आरकेएस भदोरिया यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच या कारवाईची कल्पना दिली होती. त्यानुसार आता कारवाईला सुरूवात झाली आहे.
एमआय १७ हेलिकॉप्टर २७ फेब्रुवारील श्रीनगर येथे पाडण्यात आले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली. या दुर्घटनेत सहा भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. आयएएफचे प्रमुख राकेशकुमार भदोरिया यांनी ही मोठी चूक असल्याचे मान्य केले. प्रकरण ४ ऑक्टोबरला उघड झाले. कोर्टऑफची चौकशी पूर्ण झाली आहे. ही आमची चूक होती. कारण आमच्याच क्षेपणास्त्राने आमचेच हेलिकॉप्टर पाडले गेले. त्यामुळे दोन अधिकाऱ्यावर कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी माहिती राकेशकुमार भदोरिया यांनी दिली.