सौरव गांगुली भाजपमध्ये आल्यास स्वागतच करू- अमित शहा

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या मोबदल्यात अमित शहा यांनी गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद बहाल केले, अशीही चर्चा आहे.

Updated: Oct 14, 2019, 11:34 PM IST
सौरव गांगुली भाजपमध्ये आल्यास स्वागतच करू- अमित शहा title=

नवी दिल्ली: सौरव गांगुली यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बसवण्यात माझी कोणतीही भूमिका नसल्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. ते सोमवारी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. यामध्ये अमित शहा यांनी पडद्यामागून सूत्रे हलवल्याची वदंता आहे. बीसीसीआयवर आपापल्या गटांचे वर्चस्व ठेवण्यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटाने जोरदार प्रयत्न केले. परंतु अमित शहा यांनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीची वर्णी लावल्याचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले होते. 

मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल- सौरव गांगुली

मात्र, अमित शहा यांनी या सर्व चर्चांचा स्पष्ट इन्कार केला. बीसीसीआयचा अध्यक्ष कोण असेल, हे ठरवण्यात माझी कोणतीही भूमिका नाही. त्यासाठी बीसीसीआयची स्वतंत्र अशी निवडणूक प्रक्रिया आहे. मात्र, सौरव गांगुली यांना मला भेटायचे असेल, तर ते माझ्याकडे येऊ शकतात. मी गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटशी जोडला गेलेलो आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांनी मला भेटण्यात काहीही गैर नाही, असे अमित शहा यांनी सांगितले. 

२०२१ साली पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या मोबदल्यात अमित शहा यांनी गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद बहाल केले, अशीही चर्चा आहे. याविषयी विचारणा केली असता अमित शहा यांनी म्हटले की, आमच्यात तशी कोणतीही डील झालेली नाही. हा गांगुली यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही कधीही त्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास स्वागतच असेल, असे अमित शहा यांनी सांगितले. 

मात्र, सौरव गांगुली पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा चेहरा असेल, हे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. आम्ही बंगालमध्ये कोणताही चेहरा नसताना १८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आम्ही कोणत्याही चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकही जिंकू शकतो, असेही अमित शहा यांनी सांगितले.