भोपाळ: लॉकडाऊनमुळे सध्या स्थलांतरित मजुरांच्या जथ्थेच्या जथ्थे शहरी भागांकडून आपापल्या गावांकडे परतत आहेत. सर्वस्व गमावलेल्या मजुरांच्या करुण कहाण्या दररोज कानावर पडत आहेत. यापैकी मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एक घटना सध्या प्रचंड चर्चेत आहे. याठिकाणी एका २४ वर्षीय मजुराचा गावी परतत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. अमृत कुमार असे या मजुराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशच्या बस्ती गावचा रहिवासी होता. उदरनिर्वाहासाठी अमृत सुरतमध्ये आला होता. याठिकाणी तो त्याच्याच गावातील मोहम्मद सयुब याच्यासोबत राहत होता. लॉकडाऊनमुळे हे दोन्ही मित्र गेल्या काही दिवसांपासून सुरतमध्ये अडकून पडले होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एक ट्रक मिळाला.
'माझा मुलगा अपंग आहे, मला बरेलीला जायचेय; माफ करा तुमची सायकल चोरतोय'
या ट्रकमधून अनेक मजूर प्रवास करत होते. रस्त्यात अमृत कुमारची तब्येत बिघडली. त्याला सुरतमध्ये असतानाच ताप आला होता. त्यामुळे अमृत पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेऊन प्रवास करत होता. मात्र, शुक्रवारी मध्य प्रदेशात आल्यानंतर अमृतची तब्येत प्रचंड ढासळली. तेव्हा सयुबने सोबतच्या लोकांना अमृतला डॉक्टरांकडे न्यावे लागेल, असे सांगितले. मात्र, घरी परतण्याच्या घाईत असलेल्या या सर्व मजुरांनी त्याची मदत करायला नकार दिला.
अखेर सयुब आपल्या मित्राला घेऊन ट्रकमधून खाली उतरला. अमृत लवकर बरा होऊन आम्ही दोघे घरी परतावे, एवढेच मला वाटत होते. आमच्या दोघांच्या घरचे लोक वाट पाहत होते. त्यामुळे अमृतवर उपचार होईपर्यंत मी तेथेच राहायचे ठरवले, असे सयुबने सांगितले.
...म्हणून रेल्वे रुळावर झोपलो, मजुराने सांगितली 'त्या' रात्रीची व्यथा
त्यामुळे इतरांना सोडून सयुब अमृतच्या मदतीसाठी थांबून राहिला. यानंतर सयुब कितीतरी वेळ आपल्या मित्राला घेऊन रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबला होता. सयुब अमृतचे डोके मांडीवर घेऊन बसला होता. अमृतचा ताप कमी करण्यासाठी सयुब सतत त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.अखेर बराच वेळाने रुग्णवाहिका आली. यानंतर सयुबने आपल्या मित्राला लगेच रुग्णावाहिकेत नेऊन ठेवले. यानंतर अमृतला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती प्रचंड ढासळली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, शनिवारी पहाटे अमृतचा मृत्यू झाला.
यानंतर आता सयुबला शिवपुरी येथील आयसोलेशन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालयात आल्यानंतर अमृतला हात लावायला कोणीही तयार नव्हते. तेव्हा सयुब डॉक्टर सांगतील तसे सर्वकाही करत होता. त्यामुळे आता डॉक्टरांनी सयुबला विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला. सयुब हा त्याच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती आहे. त्याने सांगितले की, अमृत हा कायम चिंतेत असायचा. सुरतमध्ये दोघेही हातमागाच्या कारखान्यात काम करत होते. अमृतला महिन्याला १०००० रुपये मिळायचे. यापैकी बहुतेक पैसे तो घरी असलेल्या भावंडांना आणि पालकांना पाठवायचा. एवढेच नव्हे तर अमृतनेच ट्रकने घरी जाण्यासाठी दोघांचे पैसे भरल्याचे सयुबने सांगितले.