जामनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. जामनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक विकास योजनांचं भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना मोदींनी कोचीचा उल्लेख कराची असा केला. ही चूक लक्षात आल्यावर मोदींनी लगेच सावरून घेतलं. काय करू हल्ली डोक्यात एकच गोष्ट आहे, अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया दिली.
आयुषमान भारत योजनेची स्तुती करताना मोदी कोचीऐवजी कराची म्हणाले. तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहात असाल, कोलकाता असो किंवा 'कराची' असं मोदी भाषणाच्या ओघात बोलले. 'जामनगरची एखादी व्यक्ती भोपाळमध्ये गेली आणि तिकडे आजारी पडली तर त्याला उपचारासाठी जामनगरला यायची गरज नाही. आयुषमान योजनेअंतर्गत कार्ड दाखवल्यावर त्याला कोलकाता असो किंवा कराची फुकट उपचार मिळतील,' असं मोदी म्हणाले. पण यानंतर लगेच 'मला कोची म्हणायचं होतं कराची नाही, हल्ली माझ्या डोक्यात शेजारी देशाचाच विचार असतो, असा टोमणा मोदींनी मारला.
पाकव्याप्त काश्मीरवर भारतीय वायुसेनेनं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही मोदींनी निशाणा साधला. 'सेना सांगत असेल तर तुम्ही यावर विश्वास ठेवत नाही का? आपल्याला आपल्या सेनेबद्दल अभिमान असला पाहिजे. दहशतवादाचा अंत केला पाहिजे यावर देश सहमत आहे. भारतीय वायुसेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम वेगळे असते. पण जर काही लोकांना समजूनच घ्यायचं नसेल, तर मी काही करु शकत नाही', असं मोदी म्हणाले.
'जर राफेल विमान वेळेत मिळालं असतं, तर स्थिती वेगळी असती. जर आमच्याकडे राफेल असतं, तर आमचं एकही विमान पडलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं. दहशतवादाचं मूळ हा आपल्या बाजूचा देश आहे. या आजाराला मुळासकट बरं केलं पाहिजे. जर भारताच्या नाशाचा हेतू ठेवणारा बाहेर असेल, तर भारत शांत बसणार नाही,' असा इशारा मोदींनी दिला.