Sania Mirza बनली देशातली पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट, रचला इतिहास

कठोर मेहनत आणि जिद्द असेल असेल तर कोणतीची गोष्ट अशक्य नाही, सानिया मिर्झाची कहाणी इतर मुलींसाठी बनलीय प्रेरणास्थान

Updated: Dec 23, 2022, 02:19 PM IST
Sania Mirza बनली देशातली पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट, रचला इतिहास title=

Sania Mirza Fighter Pilot : कठोर मेहनत आणि काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आज असं एकही क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. उंच उडण्याची स्वप्न पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. असंच एक स्वप्न सानिया मिर्झाने (Sania Mirza) या तरुणीने बघितलं आणि संघर्षाच्या जोरावर ते पूर्णही केलं. आज तिची कहाणी इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. 

पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट
उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूर इथं राहणाऱ्या सानिया मिर्झा या तरुणीने देशातील पहिली मुस्लिम फायटर पायलट (Indias first Muslim Woman fighter pilot) बनण्याचा मान पटकावला आहे. सानियाने एनडीए परीक्षेत (NDA Exam) 149 वा क्रमांकासह प्लाइंग विंगमध्ये दुसरं स्थान पटकावलं. एनडीएमध्ये 19 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सानियाचे वडिल शाहिद अली मिर्झापूरमध्ये टिव्ही मॅकेनिक म्हणून काम करतात. लहानपणापासूनच सानियाने इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण 11 वीत असताना एक अशी गोष्ट घडली की सानियाने एनडीएत प्रवेश घेण्याचा निश्चिय केला.

सानियाचं शालेय जीवन ग्रामीण भागात
मिर्झापूरमधल्या देहात कोतवाली क्षेत्रातील जसोवर या छोट्याशा गावात सानियाचं लहानपण गेलं. दहावीपर्यंतचं शिक्षण तीने गावातीलच चिंतामणी दुबे इंटर कॉलेजमधून पूर्ण केलं. उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत ती टॉपर होती. यानंतर सानियाने शहरातील गुरु नानक गर्ल्स इंटर कॉलेजमधून 12 वीचं शिक्षण पूर्ण केलं.

सानिया एनडीएची परीक्षा दिली
सानियाने 10 एप्रलि 2022 ला एनडीएचं परीक्षा दिली. नोव्हेंबरमध्ये याची यादी जाहीर झाली आणि यात सानियाचं सिलेक्शन झालं. प्लाइंगसाठी निवडल्या गेलेल्या दोन मुलींमध्ये सानियाचं नाव होतं. आता एनडिए ट्रेनिंगसाठी सानिया 27 डिसेंबरला पुण्यात दाखल होईल. केवळी सीबीएसई, आईसीएसईचे विद्यार्थी नाही तर उत्तर प्रदेश बोर्डाचे विद्यार्थीही एनडीएध्ये जाऊ शकतात हे आपण दाखवून दिल्याचं सानिया म्हणते.

एनडीएत प्रवेश घेण्याचं ठरवलं
लहानपणापासून सानियाने इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण अकरावीत असताना सानियाला देशातील पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदीविषयी माहिती मिळाली. यामुळे सानिया प्रभावित झाली आणि तिथूनच तिने एनडीएत प्रवेश घेण्याचं मनाशी निश्चित केलं. आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नासाठी हुंडा जमवण्यात कुटुंब मेहनत करतं. पण मला देशाची सेवा करायची होती, त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी असल्याचं सानिया मिर्झा सांगते.

सानियाची आर्थिक परिस्थिती बेताची
सानिया मिर्झाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. सानियाचे वडिल शाहिद अली एक टिव्ही मॅकेनिक आहेत. पण आपल्या आर्थिक परिस्थितीचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. मुलीची इच्छाशक्ती आणि तिचं स्वप्न साकार करण्यासाठी शाहिद अली यांनी कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. शालेय परीक्षेत सानिया अव्वल आल्यानंतर सानियाने आपल्याला एनडीएत जाऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. या गोष्टीचा आम्हाल अभिमान आणि आनंद झाला. यासाठी कुटुंबाने तिला पूर्णपणे पाठिंबा दिला.

वडिलांची मेहनत आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सानिया मिर्झाने आज उंच उडण्याचं स्वप्न साकार केलं आहे.