नवी दिल्ली: एखाद्या तथ्याची सातत्याने मोडतोड करून ते नव्याने सादर करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सवयीमुळे ऑक्सफर्ड शब्दकोशात 'मोदी लाय' असा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केला होता. मात्र, यावर ऑक्सफर्डकडून तात्काळ खुलासा करण्यात आला आहे. Modilie (मोदी लाय) नावाचा कुठलाच शब्द अस्तित्वात नसल्याचे ऑक्सफर्डने सांगितले.
राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विटर अकाऊंटवरून ऑक्सफर्ड शब्दकोशातील 'मोदी लाय' या शब्दाचा अर्थ सांगणारे एक छायाचित्र प्रसिद्ध केले होते. यामध्ये 'मोदी लाय'चा अर्थ सत्याची सातत्याने मोडतोड करणे, सवयीने थापा मारणे, न थकता खोटं बोलणे, अशाप्रकारे नमूद करण्यात आला होता. मात्र, हे छायाचित्र बनावट असल्याचे ऑक्सफर्डने स्पष्ट केले.
There’s a new word in the English Dictionary. Attached is a snapshot of the entry :) pic.twitter.com/xdBdEUL48r
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 15, 2019
राहुल गांधी यांनी यापूर्वीही अरूण जेटली यांच्यावर टीका करताना Jaitlie हा शब्द वापरला होता. त्यावेळी भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर पलटवारही करण्यात आला होता. राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठे व्हा, असा टोला भाजपाने राहुल गांधी यांना लगावला होता.