रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी

 रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.  

PTI | Updated: Feb 6, 2019, 10:33 PM IST
रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी  title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. वाड्रांसोबत प्रियंकाही ईडी कार्यालयाच्या दारापर्यंत आल्या. त्यानंतर त्या माघारी परतल्या. पैशांची अफरातफर करुन लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा वाड्रांवर आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. दरम्यान, पतीला आपला खंबीर पाठिंबा आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज अंमलबजावणी संचालनालयानं तब्बल साडेपाच तास चौकशी केली. आर्थिक अफरातफर आणि परदेशात बेनामी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालयालयामार्फत चौकशी सुरू आहे. संरक्षण सामुग्री खरेदी गैरव्यवहारात मिळालेल्या दलालीतून लंडनमध्ये घर खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीतल्या न्यायालयाने वाड्रा यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते आज अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाले. 

साडेपाच तासांच्या चौकशीत वाड्रा कमी शब्दात उत्तरे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपली लंडनमध्ये मालमत्ता नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे समजते आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे लेखी देण्यास सांगितले तसेच कोणतीही विधाने केली तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, प्रियंका गांधी का हाथ, पती रॉबर्ट वाड्रा के साथ असल्याचंही पुन्हा एकदा स्पष्ट झाले. लंडनहून परतलेल्या प्रियंकांनी काँग्रेस मुख्यालयात जाऊन महासचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर संध्याकाळी रॉबर्ट वाड्रांसोबत त्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयातही आल्या. काहीही झाले तरी आपण रॉबर्टसोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नेमके काय सुरू आहे, हे सगळ्या जगाला माहीत आहे, असेही त्या म्हणाल्या.