सावधान! भारतात Monkeypox चा धोका वाढला

मंकीपॉक्सचे रुग्ण वाढतायत? भारतात अलर्ट, पाहा कुठे सापडले दोन संशयित

Updated: Aug 1, 2022, 02:33 PM IST
सावधान! भारतात Monkeypox चा धोका वाढला title=

दिल्ली : भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. कोरोनापाठोपाठ आता मंकीपॉक्सचा धोका वाढत असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. नुकताच केरळमध्ये संशयित मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. आता राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. 

संशयित रुग्णांना लोक नायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये संशयित मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 27 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्याआधी केरळमध्ये तीन संशयित रुग्ण समोर आले होते. दिल्लीतील मंकीपॉक्सची लागण झालेल्या संशयित रुग्णांना आयसोलेट करण्यात आलं आहे. 

देशातील मांकीपॉक्सच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. ही टीम लसीकरणाबाबतही सरकारला माहिती देणार आहे. 

ब्रिटनमध्ये ७ मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, स्पेन, कॅनडा आणि यूएस अशा 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. या आजाराने आता जगातही मृत्यू नोंदवले जात असल्याने चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सगळे देश अलर्टवर आहेत.