MHADA Lottery 2025 : सीमित उत्पन्नमर्यादा असणारी अनेक मंडळी पगाराचा आकडा वाढत नसल्यामुळं कैक आव्हानांचा सामना करतात. धीम्या गतीनं होणाऱ्या या पगारवाढीमुळं अनेक स्वप्नांची पूर्तताही लांबणीवर पडते. हक्काच्या घरांसंदर्भातही अनेकदा हेच घडतं. मनाजोग्या ठिकाणी घर नाही, मनाजोगा परिसर नाही या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारी किंमत नाही अशा कैक कारणांमुळं स्वप्नातील घर खरेदी लांबणीवर पडत जाते.
यंदाच्या वर्षी मात्र अनेकांचच लांबणीवर पडलेलं हे स्वप्न साकार होणार आहे आणि यामध्ये मदत होणार आहे ती म्हणजे म्हाडाची. चालू वर्षात म्हाडा जवळपास अडीच ते तीन हजार घरांची सोडत जाहीर करणार असून, दिवाळीच्या मुहूर्तावर ही सोडत जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हाडा प्राधनिकरणाकडून माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या सोडत प्रक्रियेमध्ये अल्प आणि अत्यल्प गटाला सर्वाधिक प्राधान्य देत त्यांच्यासाठी मोठ्या संख्येनं घरं राखीव ठेवली जाणार आहेत.
मुंबईत घर घेण्यासाठी धडपड करणाऱ्यांना ही सोडत मोठा दिलासा देणार आहे. कारण, शहरातील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाच्या या इमारती उभारल्या जाणार आहेत. मुंबईतील सायन, पवई, ताडदेव, विक्रोळी, घाटकोपर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जुहू, अंधेरी इथं ही घरं असतील.
गोरेगाव पहाडी इथं बांधल्या जाणाऱ्या घरांचाही या सोडतीमध्ये समावेश असणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या घरांच्या वाढत्या किमती या समस्येवर आता राज्यातील नवे सत्ताधारी काही तोडगा काढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामान्यत: म्हाडाच्या घराती प्रारंभिक किंमत 34 लाखांपासून सुरू होते. पण, हे दर 27 लाखांच्या घरात असावेत अशीच मागणी सध्या उचलून धरली जात आहे. यावर आता कोणता निर्णय होतो आणि या नव्या सोडतीसाठी हे दर लागू होतात का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
म्हाडाकडून दरवर्षी साधारण दोनदा सोडत काढली जाते. कोकण मंडळासमवेत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. तेव्हा आता या मुंबईतील सोडतीला नेमका कसा प्रतिसाद मिळतो, इच्छुकांच्या अपेक्षा ही घरं पूर्ण करतात हे येत्या काळात कळेलच.