वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि...

Israel Gaza conflict: वर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावरील मोठी घडामोड; नेमकं काय आणि कसं घडलं... पाहा इस्रायलनं दिलेली माहिती जशीच्या तशी... 

सायली पाटील | Updated: Jan 1, 2025, 09:22 AM IST
वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि... title=
(छाया सौजन्य- X)israels idf confirms elimination of hamas commander abd al hadi sabah on new year firsat day

IDF strikes Hamas commander : संपूर्ण जगभरात सध्या सर्व संघर्ष विसरून नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत होत असतानाच इस्रायल आणि हमास यांच्यात धुमसणारी ठिणगी मात्र अद्यापही विझलेली नाही. उलटपक्षी या ठिणगीला आणखी वारा मिळाल्यानं तिचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. 

इस्रायलच्या लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या वृत्तानुसार त्यांनी हमासच्या नुखबा प्लाटूनच्या म्होरक्याचा खात्मा केला आहे. अब्द अल-हादी सबाह याच्या घरावर ड्रोन हल्ला करत त्याला संपवण्यात आल्याची माहिती इस्रायलकडून जारी करण्यात आली आहे. सबाह याला त्याच्यात घरात, घुसून ठार करत इस्रायलनं याबाबतची ग्वाही साऱ्या जगात दिली. अब्द अल-हादी सबाह याच्यावर 7 ऑक्टोबर 2023 रोजी किब्बुत्ज निर ओजवरील हल्ल्याचा आरोप असून, इस्रायलवर करण्यात आलेल्या घातक हल्ल्यांपैकीच हा एक हल्ला ठरला होता. 

ANI वृत्तसंस्थेनं सुत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार IDF च्या अधिकृत माहितीपत्रकानुसार अब्द अल-हादी सबाह याच्यावर गाझाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या खन युनिस प्रांतामध्ये निशाणा साधण्यात आला. या मोहिमेमध्ये इस्रायलला गुप्तचर यंत्रणेसह इस्रायली सुरक्षा यंत्रणेनं मोठं योगदान देत संयुक्तरित्या ही मोहीम फत्ते केली. उपलब्ध माहितीनुसार इथं एका लोकवस्तीमध्ये सबाहनं शरण घेतलं होतं, इथूनच तो हमासच्या कैक दहशतवादी कारवायांना अंतिम रुप देत होता. 

इस्रायली संरक्षण यंत्रणांकडून दहशतवाद्यांचा खात्मा 

इस्रायली लष्करानं जारी केलेल्या माहितीनुसार 162व्या स्टील डिवीजनकडून जबालिया आणि बैत लाहिया क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या कारवाईअंतर्गत हमासच्या 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर सातत्यानं हल्ले केले आहेत अशांचा शोध घेत या मोहिमेअंतर्गत हमासला हादरा देण्याचा इस्रायलचा मनसुबा असल्याचं सांगितलं जात आहे. 

इस्रायल आणि हमासमधील या सततच्या हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत 45000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, सध्या ही तणावाची परिस्थिती एक मोठं माननिर्मित संकट म्हणन सबंध जगाची चिंता वाढवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कैक संघटनांनी या तणावग्रस्त परिस्थितीची निंदा करत सततचे हल्ले थांबवण्याची मागणीसुद्धा केली आहे.