Monsoon Update : उकाड्यानं हैराण झालेल्या प्रत्येकासाठीच ही अत्यंत मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी. कारण, आता अवघ्या काही दिवसांतच हा उकाडा तुमची पाठ सोडणार आहे. थोडक्यात लांबणीवर गेला म्हणता म्हणजा आता मान्सून पुढच्या 24 तासांत अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत असल्याची माहिती IMD नं दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच आयएमडी आणि स्कायमेट (Skymet) या दोन्ही संस्थांकडून यंदाच्या मान्सूनची तारीख लांबणीवर पडल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, त्यातच आता मान्सून अंदमानात वेळतच दाखल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथून पुढं म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 3 ते 4 जूनपर्यंत दाखल होईल. आणि त्यानंतरच काही दिवसांनी तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचणार आहे.
दरम्यान, प्रवासाच्या पहिल्याच टप्प्यात मान्सून निकोबार, अंदमानचा दक्षिण भार आणि बंगालच्या उपसागर क्षेत्राला व्यापणार आहे. परिणामी पुढच्या पाच दिवसांमध्ये केरळच्या विविध भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या येण्याची बातमी मिळेल असं सांगण्यात येत आहे. देशभरात सध्याच्या घडीला असणारं तापमान पाहता पर्वतीय क्षेत्र वगळता बहुतांश भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही जास्त असेल.
अंदमानात सध्या चक्रिवादळसदृश परिस्थिती उदभवल्यामुळं नजीकच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण, मान्सूनच्या वाटचालीत मात्र या परिस्थितीमुळं कोणताही अडथळा निर्माण होणार नाहीये.
सहसा मान्सून 20 मे ते 1 जून दरम्यान भारताच्या दिशेनं प्रवास सुरु करतो. या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात तो अंदमानात पोहोचतो. अंदमानात मान्सून 16 ते 20 मे पर्यंत कमीजास्त प्रमाणात दाखल होतो. असं असलं तरीही मुख्य भारतात मात्र दक्षिण पश्चिम मान्सून सक्रीय असल्यामुळं इथं केरळवाटे येणारा मान्सूनच महत्त्वाची भूमिका बजावतो. केरळात मान्सून 25 मे ते 1 जून दरम्यानच्या काळात दाखल होतो. यामध्ये 3-6 दिवस मागेपुढे होऊ शकतात. त्यामागोमाग मान्सून तामिळनाडू, बंगालचा उपसागर, कोकणाचं क्षेत्र व्यापतो आणि 15 जूनपर्यंत पूर्णपणे सक्रीय होतो. त्याचा पुढचा रोख मुंबई, गुजरात आणि देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेनं असतो.
यंदाच्या वर्षी मान्सून ठरलेल्या वेळेत दाखल झाला आणि वर्तवलेल्या अंदाजानुसार बरसला तर, हे प्रमाण 96 टक्क्यांच्या घरात राहू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवत हा मान्सून सामान्य असेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं आता येत्या काळात या टक्केवारीमध्ये काही बदल होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.