भोपाळ : मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमधून एक धक्कादायक माहिती हाती येतेय. इथं एका वाघानं वाघिणीची हत्या केलीच परंतु, त्यानंतर वाघानं या वाघिणीचं शव चावून चावून खाल्लं. उल्लेखनीय म्हणजे, या अगोदर वाघ अनेकदा वाघिणीच्या बछड्यांना मारताना आणि खाताना दिसले होते, ऐकण्यात आलं होतं. परंतु, समवयस्क वाघिणीची हत्या करून तिला खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आलाय. या घटनेनं कान्हा पार्कच्या प्रशासनालाही धक्का बसलाय.
वाघिणीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर वर्चस्वाच्या लढाईमुळे ही घटना घडली असावी, असं मत कान्हा नॅशनल पार्कच्या प्रशासनानं म्हटलंय. पार्क प्रशासनाला या दोन वर्षांच्या वाघिणीचं शव शनिवारी सामान्य पेट्रोलिंग दरम्यान सापडलं होतं. वाघानं या शवाचे अनेक तुकडे-तुकडे केले होते. ते दृश्य पाहिल्यानंतर, ही शिकार वाघाणच केली, हे स्पष्ट होत होतं.
प्रथमदृष्ट्या प्रशासन आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा वाघानंच केलेला हल्ला आहे. वाघिणीची शिकार केली गेली असावी किंवा भूक मिटवण्यासाठी तिला खाण्यात आल्याचे दावे त्यांनी फेटाळून लावले. वर्चस्ववादाच्या लढाईत वाघिण केवळ वाघाच्या रागाची शिकार ठरल्याचा दावा त्यांनी केलाय. परंतु, एका वाघानं वाघिणीची केलेली शिकार आणि तिचा मृतदेह खाणं, हे अतिशय गंभीर प्रकरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.