Shocking News : मध्य प्रदेशातून (MP News) एक विचित्र घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इतिहासात अशी घटना घडलीय ज्याचा कोणी कधीच विचार केला नसेल. मध्य प्रदेशातील रीवा येथील एका रहिवाशाने दागिन्यांचा बॉक्सच चुकून कचऱ्यात फेकून दिला होता. लाखो टन कचऱ्यातून बराच वेळ शोध घेतल्यानंतर दागिन्यांचा बॉक्स शोधण्यास यश आलं आहे. मध्य प्रदेशात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका कुटुंबाने चोरांच्या भीतीने घरातील सर्व दागिने कचऱ्याच्या डब्यामध्ये लपवून ठेवले होते. मात्र घरी आलेल्या एका नातेवाईकाने कचऱ्याच्या गाडीत कचऱ्याचा डबा उलटा केला. डब्यातले दागिनेही घरोघरी कचरा उचलणाऱ्या वाहनातून थेट डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचले होते. घरी पोहोचल्यावर घरातील सदस्यांचे 24 तास दागिने ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष नव्हते. पण आठवण आल्यानंतर कचऱ्याचा डबा पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. रिकामा कचऱ्याचा डबा पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
कचऱ्याच्या डब्यात दागिने ठेवून हे कुटुंब काही कामानिमित्त राजधानी भोपाळला गेले होते. भोपाळला जाण्यापूर्वी कुटुंबीयांनी चोरांच्या भीतीने घरातील सर्व दागिने कचऱ्याच्या डब्यामध्ये लपवून ठेवले होते. दागिने लपवल्यानंतर कुटुंबीय भोपाळला गेले. ते दुसऱ्या दिवशी परतणार होते पण त्याच्या आधीच त्यांचा जावई घरी आला. जावई घरी आल्यानंतर घरासमोरून कचरा उचलणारा ट्रक जात होता. त्यानंतर जावयाने घरात ठेवलेला कचऱ्याचा डबा 12 लाखांच्या दागिन्यांसह कचऱ्याच्या गाडीत रिकामा केला. कचऱ्यासह 12 लाखांचे दागिने घेऊन कचऱ्याची गाडी डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचली. मात्र तो पर्यंत 24 तास उलटून गेले होते.
भोपाळवरुन परतल्यानंतर कुटुंबीयांनी 24 तास त्या कचऱ्याच्या डब्याकडे लक्षच दिलं नाही. मात्र जेव्हा त्यांचे कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांना धक्का बसला. डबा पाहिला असता कचऱ्यासहीत 12 लाखांचे दागिने गायब होते. हा प्रकार घरमालकाला समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर चौकशी केल्यानंतर जावयाने कचरा गाडीमध्ये टाकल्याचे सांगितले. यानंतर जोरदार वाद झाला. वाद शांत झाल्यावर शोधाशोध आणि धावपळ सुरु झाली. कचऱ्याची गाडी कुठे गेली असेल याचा शोध कुटुंबियांकडून घेण्यात येऊ लागला. पण गाडी नेमकी कुठे गेली याची कोणालाच माहिती नव्हती. शेवटी बराच शोधाशोध केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या डम्पिंग ग्राऊंडवर हा कचरा टाकला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे जाऊन बराच शोध घेतला असता 12 लाख रुपयांचे दागिने कचऱ्यात सापडले. यानंतर दागिन्यांच्या मालकाने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.