मुंबई: काही दिवसांपूर्वी रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपले बंधू अनिल अंबानी यांची आर्थिक अडचणीच्यावेळी मदत केल्याचे समोर आले होते. यानंतर सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांच्या बंधूप्रेमाचे कौतुक होत आहे. मात्र, या सगळ्यामागे बंधूप्रेम नव्हे तर रोकडा व्यवहार असल्याची चर्चा उद्योगविश्वात सुरु आहे.
एरिक्सन या कंपनीने अनिल अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींच्या थकबाकीप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता. यापैकी ११८ कोटी रूपेये रिलायन्स कम्युनिकेशनने अगोदरच एरिक्सनला दिले होते. मात्र, उर्वरित रक्कम भरण्यात अपयश आल्याने एरिक्सनने अनिल अंबानी यांच्याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनला उर्वरित पैसे भरण्यासाठी १९ मार्च पर्यंतची मुदत दिली होती. अन्यथा तुरुंगात जाण्यासाठी तयार राहा, असेही न्यायालयाने बजावले होते. त्यामुळे अनिल अंबानी पैसे कुठून आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अनिल यांचे ज्येष्ठ बंधू मुकेश हे त्यांच्या मदतीला धावून आले. मुकेश यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे अनिल अंबानी यांनी एरिक्सनची रक्कम सव्याज फेडली आहे.
यानंतर अनिल अंबानी यांनी ट्विट करून जाहीरपणे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता यांचे आभार मानले होते. त्यामुळे साहजिकच अनेकांनी मुकेश अंबानी यांच्या औदार्याचे कौतुक करायला सुरुवात केली. मात्र, या सगळ्यापाठी औदार्य किंवा बंधूप्रेम नसून रोकडा व्यवहार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मदतीपोटी मुकेश अंबानी यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी २०१७ साली मुकेश यांची जियो इन्फोकॉम आणि अनिल यांच्या आरकॉममध्ये व्यवहार झाला होता. तेव्हा मुकेश यांना आरकॉमची मालमत्ता विकत घेणार होते. याच पैशातून एरिक्सनचे पैसे फेडण्याचा अनिल यांचा मानस होता. मात्र, हा व्यवहार फिसकटला होता आणि अनिल अंबानी अडचणीत सापडले होते.
मात्र, काही जाणकरांच्या अंदाजानुसार मुकेश अंबानी यांनी व्यापारी गणित डोक्यात ठेवूनच आरकॉमची मालमत्ता विकत घेण्याचा निर्णय टाळला होता. अनिल अंबानी दिवाळखोर झाल्याने आरकॉमचे बाजारमूल्य कमी झाले आहे. त्यामुळे आता मुकेश अंबानी यांना आरकॉमचे स्पेक्ट्रम, टॉवर्स आणि फायबर लाईन्स असा संपूर्ण पसारा १७३ अब्ज रुपयांत विकण्यासाठी अनिल अंबानी तयार झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत जिओची ताकद आणखीनच वाढेल.