राष्ट्रपतीभवनात मोदींच्या शपथविधीत दिसलेल्या 'त्या' प्राण्याचं 'गूढ' उलगडलं! दिल्ली पोलीस म्हणाले..

Mysterious Animal At Rajbhavan In Modi Government Oath Ceremony: सोशल मीडियावर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या शपथविधीदरम्यानची ही व्हिडीओ क्लीप प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हा बिबट्या आहे की काय अशी शंका अनेकांनी उपस्थित केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 11, 2024, 09:27 AM IST
राष्ट्रपतीभवनात मोदींच्या शपथविधीत दिसलेल्या 'त्या' प्राण्याचं 'गूढ' उलगडलं! दिल्ली पोलीस म्हणाले.. title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोंधळ

Mysterious Animal At Rajbhavan In Modi Government Oath Ceremony: लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 64 खासदारांनी रविवारी, 9 जून 2024 रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) मंत्रिपदाची शपथ घेतली. हा भव्यदिव्य शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या (NDA Oath Ceremony) प्रांगणात पार पडला. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या या शपथविधी सोहळ्याला एकूण 8 हजार पाहुणे उपस्थित होते. सार्क देशांचे नेते, उद्योजक, बॉलिवूड स्टार्सने या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावलेली. या अति महत्त्वाच्या लोकांची उपस्थित असलेल्या सोहळ्यातील एक व्हिडीओ वेगळ्याच करणासाठी चर्चेत आहे. राष्ट्रपती भवनामधील या व्हिडीओमध्ये एका प्राण्याची गूढ आकृती दिसून आल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र या व्हिडीओमागील सत्य आता समोर आलं असून दिल्ली पोलिसांनीच यासंदर्भात खुलासा केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेला हा व्हिडीओ शपथविधीमध्ये भाजपाचे नवनिर्वाचित खासदार दुर्गा दास यांना शपथ देऊ झाल्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली त्यावेळेचा आहे. या व्हिडीओमध्ये मागील बाजूस एका प्राण्याची आकृती चालताना दिसत आहे. सदर व्हिडीओमध्ये पुढील बाजूला खासदार दुर्गा दास आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसत आहेत. हा व्हिडीओ सोमवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. काहींनी तो बिबट्या होता का? की मांजर किंवा कुत्रा होता? अशा शंका उपस्थित केल्या. अनेकांनी तर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या राष्ट्रपती भवनसारख्या ठिकाणी थेट मंचाजवळ हा प्राणी पोहोचल्याने चिंता व्यक्त केली होती. 

दिल्ली पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

शपथविधीला अनेक तास उलटल्यानंतर अनेक तास सोशल मीडियावर या व्हिडीओसंदर्भात चर्चा सुरु होती. अनेक वृत्तवाहिन्यांनीही हा व्हिडीओ राष्ट्रपती भवनात बिबट्या होता का? असा प्रश्नार्थक मथळा देत चालवला. अखेर या व्हिडीओवर प्रशासकीय यंत्रणेकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडीओत दिसलेला हा प्राणी नेमका कोणता होता याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या आसपास दिल्ली पोलिसांच्या अधिकृत हॅण्डलवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण पोस्ट करण्यात आलं. "काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कॅमेरात कैद झालेल्या प्राण्याचं चित्रिकरण दाखवत आहेत आणि तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत," असं दिल्ली पोलिसांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे कॅमेरात कैद झालेली ही प्रतिमा कसली होती याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलं आहे. "हे (वृत्तवाहिन्यांवर, सोशल मीडियावर केले जाणारे) दावे खरे नाहीत. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी साधी घरगुती मांजर आहे. कृपया अशा फालतू अफवांना अजिबात लागू नका," असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रपती भवानाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. दुसरीकडे दिल्लीतील वनविभागाच्या अधिकाऱ्याने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना, "हा प्राणी बिबट्या नाही. हा प्राणी एखादी मांजर किंवा कुत्रा असल्यासारखं व्हिडीओवरुन म्हणता येईल," अशी प्रतिक्रिया नोंदवली.