Tripura, Meghalaya, Nagaland Election Result Vote Couting LIVE: देशात तीन राज्यांच्या निवडणुकीचे आज निकाल लागत असल्याने या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. वाढती महागाईने त्रस्त झालेल्या जनतेने कौल कुणाला दिलाय याची उत्सुकता आहे. पुन्हा भाजपला कौल मिळणार की विरोधी पक्षांना जनता पसंती देणार याकडेही लक्ष लागले आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभेच्या विधानसभा निवडणुकीसाठी(Nagaland Meghalaya Tripura Vote Couting) आज मतमोजणी होत आहे. ही मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. सकाळी नऊनंतर तिन्ही राज्यांतील विजय-पराजयाचे ट्रेंड समोर येऊ लागतील. दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्रिपुरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. (Nagaland, Tripura and Meghalya Election Results)
मेघालयमध्ये भाजप, काँग्रेस, एनपीपी, टीएमसी आणि इतरांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांना त्यांच्या बाजूने निकाल लागतील, असा दावा केला आहे. मेघालयमध्ये भाजप पहिल्यांदाच 60 जागांवर निवडणूक लढवत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. मेघालयमध्ये मतमोजणीसाठी 13 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी 27 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ईशान्य भारतातील मेघाल, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी,आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टीची सत्ता आहे.. ते आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. तर नागालँडमध्ये मतमोजणीसाठी 16 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी येथे 15 हजारांहून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. नागालँडमध्येही मतमोजणीची विशेष तयारी सुरु आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
त्रिपुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्रिपुरामध्येही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी करण्यात आली आहे. राजधानी आगरतळामध्ये कलम 144 लागू आहे. त्रिपुराच्या बोर्डोवली सीटवर लोकांची विशेष नजर आहे. येथे सीएम माणिक साहा आणि काँग्रेसचे आशिष कुमार साहा यांच्यात लढत आहे. त्रिपुरातील 259 उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी 21 केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्रिपुरामध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यापैकी 59 जागांवर निवडणूक झाली आहे. त्रिपुरातील विधानसभेच्या 59 जागांचे निकाल आज लागणार आहेत.
सध्या तीन राज्यांतील एकूण 178 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. या जागांवर एकूण 811 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीपूर्वी काँग्रेसने भंवर जितेंद्र सिंह आणि मुकुल वासनिक यांना त्रिपुरात पाठवले आहे, तर ज्येष्ठ नेते नारायण सामी यांना मेघालयात पाठवले आहे. काँग्रेस पक्षाचे नागालँडचे प्रभारी अजय कुमार आणि मेघालय प्रभारी मनीष चतरथ हेही आपापल्या राज्यांवर लक्ष ठेवणार आहेत.