सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये नरकासुराच्या प्रतिकृतींचं दहन करण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये नरकासूर दहनाची मोठी परंपरा आहे. पणजी, म्हापसा, फोंडा आणि मडगावात भव्य नरकासुराच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या.
दिवाळीच्या पूर्व संध्येला नरकासुराच्या अक्राळ विक्राळ भव्य प्रतिमा उभारल्या जातात आणि रात्रभर त्यांच्यापुढे नाच केला जातो.... या नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी संध्याकाळी रस्ते फुलून जातात. गोव्यात नरकचतुर्दशीच्या भल्या पहाटे नरकासुराचं दहन केलं जातं. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. गोवातली ही प्रथा नक्की कधी सुरु झाली याबाबत माहिती उपलब्ध नाही. पण शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. गोव्यात १० फुटांपासून ३० फुंटापर्यंत नरकासूराच्या प्रतिमा उभारल्या जातात. नरकासुर जेवढा आक्राळ विक्राळ तितका चांगला असं गोव्यात मानलं जातं.
सिंधुदुर्गातही भल्या पहाटे नरकासूर दहनाची स्पर्धा रंगली. मालवण समुद्र किनारी आणि सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर दरवर्षी नरकासुर दहन केलं जातं. यावर्षी रात्रभर अनेक हौशी मंडळांनी नरकासुराच्या प्रतिमा बनवून त्यांची भर बाजारपेठेतून वाजत गाजत धिंड काढली. या स्पर्धेत सुमारे २५ नरकासूर सहभागी झाले होते.
नरकासुर दहन पहाण्यासाठी मालवण समुद्र किनाऱ्यावर सकाळी गर्दी लोटली. नरकासुर दहनाचा हा कर्यक्रम पहाटे चार वाजल्या पासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु होता.