कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक; पण, रुग्णवाढीचा वेग कायम

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ....

Updated: Sep 23, 2020, 10:39 AM IST
कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक; पण, रुग्णवाढीचा वेग कायम
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस Coronavirus गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. भारतातही चित्र काही वेगळं नाही. सुरुवातीला काहीसा नियंत्रणात असणारा कोरोना पाहता पाहता सारा देश व्यापून गेल्याचं पाहायला मिळालं. दर दिवशी देशात हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळत आहेत. परिणामी देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. 

देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेनं जास्त असल्यामुळं ही एक दिलासादायक बाब आहे. पण, त्यातही रुग्णवाढीचा वेग मात्र मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं आव्हानाची परिस्थिती उभी राहत आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ८३३४७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. शिवाय १०८५ कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. 
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५६,४६,०११ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये सध्याच्या घडीला ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ४५,८७,६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशात दररोज ९० हजाराहून नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झालं आहे. मात्र, भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही जास्त आहे. भारतानं नुकतंच रिकव्हरी रेटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. कोरोना रिकव्हरी रेटमध्ये भारत अव्वल स्थानी आला आहे.