महिलांना व्यवसायात सक्रीय करण्यासाठी सरकारचा 'मेगा प्लान'

जाणून घ्या काय आहे सरकारचा मेगा प्लॅन.    

Updated: Sep 10, 2020, 11:09 AM IST
महिलांना व्यवसायात सक्रीय करण्यासाठी सरकारचा 'मेगा प्लान' title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी उत्तर प्रदेश सरकारने उपलब्ध करून दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येथील महिला 'टेक होम रेशन' योजनेत सामील होऊ शकतात. उत्तर प्रदेशातील सरकार आता महिला बचतगटांमार्फत रेशन पुरवणार आहे. त्यासाठी राज्य ग्रामीण उपजीविका मिशनने (एसआरएलएम) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) World food program बरोबर करार केला आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची नवी उमेद मिळाली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यानुसार,  २० वर्षांत बचतगटांना दिलेले कर्ज जवळपास दुप्पट होईल. त्यांच्या मते, ग्रामीण उपजीविका मिशनच्या व्यापक बचतगट नेटवर्कच्या ब्लॉक स्तरावर 'टेक होम रेशन' अंतर्गत स्थानिक उत्पादन सुरू करण्याची योजना आहे.

ज्यामध्ये १८ जिल्हे, २०४ ब्लॉक आणि ४२ हजार २२८ आंगनवाडी केंद्रांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या १८ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये  अलिगड, आंबेडकरनगर, औरैया, बागपत, बांदा, बिजनौर, चांदौली, इटावा, फतेहपूर, गोरखपूर, कन्नौज, खेरी, लखनऊ, मैनपुरी, मिझरपूर, प्रयागराज, सुलतानपूर आणि उन्नाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

स्टार्टअप व्हिलेज एंटरप्रेन्योरशीप प्रोजेक्ट (एसवायईपी) अंतर्गत २० हजार ६८९ महिला लघु उद्योगांशी जोडल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ही कल्पना गरीब कुटुंबातील महिलांना बचतगटांमध्ये सामील होण्यास आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करते. 

दरम्यान महिला बचतगटांनी कोरोना महामारीच्या काळात ९४.२६ लाख मास्क ५० हजारांपेक्षा जास्त पीपीई किट आणि जवळपास २५.९  लाखांपेक्षा जास्त शाळेचे गणवेश त्याचप्रमाणे १४ हजार लिटरपेक्षा जास्त सॅनिटायझर तयार केलं आहे.