उर्वशी खोना झी 24 तास नवी दिल्ली: फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामीपणाचा वारसा सांभाळणाऱ्या सावित्रीच्या लेकी आजही महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवतायत. जेलमधील जातीव्यवस्थेविरोधात सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांनी आवाज उठवला होता. सुकन्या शांता यांचा जेलमधील जातीव्यवस्थेच्या लेखामुळं ब्रिटीश काळापासून सुरु असलेली जातीव्यवस्था संपुष्टात येणार आहे. जेलमधील जातीव्यवस्थेविरोधात लढणाऱ्या या मराठी मुलींनी सावित्रीच्या लेकींचा वारसा समर्थपणे पुढं चालवलाय.
सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर या दोघींनीही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा पुढं चालवलाय... या दोघींनी तुरुंगातील जाती व्यवस्थेविरोधात आवाज उठवलाय. देशातील तुरुंगात जातीय भेदभाव केला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुकन्या शांता यांनी एका खासगी संकेतस्थळासोबत काम करताना जेलमधील जातीय व्यवस्थेवर भाष्य करणारी लेखमाला लिहिली होती. याच लेखमालेच्या आधारे ऍडव्होकेट दिशा वाडेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं जेलमधील जात व्यवस्था हद्दपार करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना सरन्यायाधिशांनी सुकन्या शांता आणि दिशा वाडेकर यांच्या कामाचं कौतुक केलं.
धन्यवाद सुकन्या शांता, धन्यवाद तुम्ही जेलमधील जातीव्यवस्थेवर लिहिलेला लेख या खटल्याच्या सुनावणीत खूपच उपयुक्त ठरला. या निकालानं जेलमधील परिस्थिती बदलेल अशी आशा आहे. असं सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड सुनावणीवेळी म्हणाले. महाराष्ट्रातील जेल जाती व्यवस्थेबाबत सांगताना शांता सुकन्या यांनी साध्वी प्राज्ञासिंह हिच्या दिमतीला विशिष्ट जातीच्या महिला कैद्यांना ठेवल्याचं उदाहरण दिलं.
सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी देशातील जवळपास 11 राज्यातील जेल प्रशासनांना जातव्यवस्था संपवण्याचे आदेश दिलेत. एवढंच नाही तर याचा अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यास सांगितलंय.सुकन्या शांता आणि दिशा वाडकर यांच्या याचिकेमुळं ब्रिटीशांनी जेलमध्ये बनवलेली जात व्यवस्था मोडीत निघालीय. या सावित्रीच्या लेंकींनी सावित्रीबाईंच्या खऱ्या वारसदार असल्याचं सिद्ध केलंय.