Nirbhaya case:'त्यांना भारत-पाक बॉर्डरवर लढायला पाठवा, पण फाशी देऊ नका'

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या वकिलांची मागणी

Updated: Mar 19, 2020, 04:46 PM IST
Nirbhaya case:'त्यांना भारत-पाक बॉर्डरवर लढायला पाठवा, पण फाशी देऊ नका' title=

नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना सरकारने भारत-पाकिस्तान सीमेवर किंवा डोकलाममध्ये पाठवावे. मात्र, त्यांना फाशी देऊ नये. हे सर्वजण देशाची सेवा करायला तयार आहेत, असे वक्तव्य निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींचे वकील एपी सिंह यांनी केले. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पटियाला हाऊस कोर्टाने गुरुवारी दोषी मुकेशकुमार सिंह याची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी काही ना काही कारण शोधून काढणाऱ्या निर्भयाच्या मारेकऱ्यांपुढील सर्व पर्याय संपले आहेत. 

निर्भया प्रकरणातील दोषीच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

गेल्या काही दिवसांमध्ये दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी जंगजंग पछाडून पाहिले होते. या सगळ्यांना थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. याशिवाय, दोषींकडून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. दोषी पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या. तरीही दोषींनी प्रत्येक कायदेशीर हक्काचा वापर करत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा सपाटा लावला होता. मात्र, पटियाला हाऊस कोर्टाच्या निकालानंतर आता याचिकांचे हे सत्र जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र, शेवटच्या क्षणी दोषींकडून आणखी एखादी नवी कायदेशीर खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. 

तसे न घडल्यास निर्भया बलात्कार प्रकरण उद्या खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाईल. उद्या सकाळी साडेपाच वाजता तिहार कारागृहात मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना दोषींना फाशी देण्यात येईल. फाशी देणारा जल्लाद पवनही दोन दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगात दाखल झाला होता. यानंतर फाशी देण्याची तालीमही झाली होती. त्यानुसार आता उद्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.