पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपली आहे. पणजीच्या एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रमोद सावंत यांच्यासहित भाजपाचे आमदार उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंदर्भातील निर्णय घेतील असे यावेळी अमित शाह यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे लवकरच अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बैठकीनंतर गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन उप मुख्यमंत्र्यांच्या नावाची देखील घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री हे प्रमोद सावंत असतील अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. भाजपातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी)चे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी( एमजीपी) चे सुदीन धवलीकर हे उपमुख्यमंत्री असू शकतील असेही सांगण्यात येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री कोण असणार यावर या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमोद सावंत हे नाव यामध्ये आघाडीवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान गोवा भाजपा अध्यक्ष विनय तेंडुलकर यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. तसे तर माझे नाव देखील मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहे. तसे तर सर्वांचीच नावे आहेत. अशी नावे तर येत राहतीलच. असे तेंडुलकर म्हणाले. मुख्यमंत्री कोण होणार हे बैठकीत ठरेल असेही ते म्हणाले.