close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गोव्याचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी सक्रिय; उद्या राजभवनात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी?

उद्या सकाळी १० वाजेपर्यंत राजभवनात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता.

Updated: Mar 17, 2019, 11:11 PM IST
गोव्याचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी सक्रिय; उद्या राजभवनात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी?

मुंबई: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राज्यात निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी नितीन गडकरी रविवारी रात्रीच विमानाने गोव्यात दाखल होणार असल्याचे समजते. यापूर्वी २०१७ साली गोवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा गडकरी आणि पर्रिकर यांनी अत्यंत धुर्त डावपेच खेळून लहान पक्षांचा पाठिंबा मिळवला होता. याच बळावर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करणे शक्य झाले होते. त्यामुळे यावेळीही ही जबाबदारी गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आल्याची शक्यता आहे. गडकरी आज रात्रीपासूनच सक्रिय होतील. जेणेकरून उद्या सकाळी १० वाजेपर्यंत राजभवनात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून घटकपक्ष किंवा काँग्रेसमधील बंडखोर आमदाराला मुख्यमंत्रीपद देऊन सत्ता राखली जाऊ शकते. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पर्रिकरांच्या निधनानंतर केंद्राकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

काँग्रेसने शनिवारीच भाजप सरकार अस्थिर असल्याचे सांगत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. यानंतर दिल्लीत भाजपकडून चक्रे फिरायला सुरुवात झाली होती. आज सकाळीच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. तेव्हापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत असून ते भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे समजते. २००५ साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपदही भुषवले होते.