नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे. दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -19 रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची मागणी 3,095 मेट्रिक टन एवढी होती. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी 9,000 मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत सांगितलं.
भारती पवार म्हणाल्या की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोविड प्रकरणं आणि मृत्यूच्या संख्येची केंद्राला नियमित माहिती देतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची नोंद करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. या अनुषंगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कोविडची प्रकरणे आणि त्या कारणाने होणाऱ्या मृत्यूची संख्या याबद्दल नियमितपणे केंद्र सरकारला माहिती देतात. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही, असं भारती पवार यांनी म्हटलं आहे.