बालाकोट एअर स्ट्राईकचं श्रेय कुणीही घेऊ नये - नितीन गडकरी

'पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या हवाई कारवाईला निवडणुकीशी जोडलं जाणं अयोग्य आहे'

Updated: Mar 26, 2019, 12:55 PM IST
बालाकोट एअर स्ट्राईकचं श्रेय कुणीही घेऊ नये - नितीन गडकरी title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भारतीय वायुदलाच्या कारवाईला लोकसभा निवडणुकीशी जोडलं जाऊ नये तसंच कुणीही याचा राजकीय फायदा किंवा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. याचसोबत आपण कोणत्याही पदाचा दावेदार नाही किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही नाही, हे सांगण्यास गडकरी विसरले नाहीत. रस्ते परिवहन आणि राजमार्ग, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी, नरेंद्र मोदी मोठ्या मताधिक्यानं पंतप्रधान पदावर परत येतील आणि त्यांना यंदा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही मोठा जनादेश मिळेल, अशी आशा व्यक्त केली.

'पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या हवाई कारवाईला निवडणुकीशी जोडलं जाणं अयोग्य आहे. हा निवडणुकीचा मुद्दा बनवला जाऊ नये तसंच कुणीही याचं श्रेय घेऊ नये' असं म्हणतानाच 'विरोधकांना जर यावर संशय असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे परंतु, मी आवाहन करेन की या मुद्द्याचं राजकारण करण्यात येऊ नये' असं गडकरींनी म्हटलंय.

निवडणूक प्रचारात बालाकोट एअर स्ट्राईकच्या मुद्द्याला उचलून धरलं जात असल्यावरून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. 'आपल्यासाठी सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. या मुद्याचं राजकारण केलं जाऊ नये. भारतात जर कुणाला आपल्या जवानांच्या शौर्यावर संशय असेल आणि कुणी पाकिस्तानची भाषा बोलत असेल तर ते देशहिताच्या विरुद्ध आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सर्वांचं एकमत असायला हवं. या मुद्यांपासून राजकारण दूरच ठेवायला हवं' असंही त्यांनी म्हटलंय. 

निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी इतर राजकीय पक्षांच्या समर्थनाची गरज भासल्यास पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून समोर येतंय. यावर बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सामील नसल्याचंही स्पष्ट केलंय. 'पंतप्रधान बनण्याची ना माझी इच्छा आहे ना आरएसएसची अशी काही योजना आहे' असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं.