गोव्यात प्रवेशासाठी आता ‘ही’ अट

कोरोना रोखण्यासाठी गोवा सरकारचं धोरण

Updated: May 27, 2020, 04:18 PM IST
गोव्यात प्रवेशासाठी आता ‘ही’ अट title=

पणजी :  कोरोना मुक्त होऊनही बाहेरून आलेल्या लोकांमुळे पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण वाढत असलेल्या गोव्यात आता कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

देशीविदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यात कोरोना व्हायरसला आळा घालण्यात सुरुवातीलाच यश आलं. गोव्यात सुरुवातीला सात कोविड बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी सहा जण परदेशातून प्रवास करून आलेले होते. तर एकाला संसर्गातून लागण झाली होती. पण वेळीच उपाययोजना करून गोवा सरकारने कोरोना नियंत्रित ठेवला होता. आयसीएमआरच्या नियमावलीचं पालन करून आणि सीआरपीएफचा बंदोबस्त लावून गोव्यात लॉकडाऊनचं काटेकोर पालन केल्याने कोरोना स्थिती आटोक्यात आली होती आणि गोवा कोरोनामुक्त राज्य ठरलं होतं.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात गोव्यात बाहेरील व्यक्तिंना प्रवेश देण्यात आला. मुंबई आणि अन्य ठिकाणाहून गेलेल्या अनेकांना कोरोना असल्याचे आढळल्याने गोव्यात पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या ५५ वर पोहचली.

गोव्यातही चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे. आता विमानसेवाही सुरु झाली आहे आणि पुढच्या टप्प्यात रेल्वे सेवाही सुरु होणार आहे. याशिवाय रस्ते वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु होणार आहे. त्यामुळे गोव्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने आता गोवा सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तिंना आता कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे.

गोव्यात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, आम्ही कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र आणि कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा पर्याय आता उपलब्ध राहणार नाही. एकतर तुम्ही कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आणा किंवा कोविडची चाचणी करून घ्या.

 

राज्यात प्रवेश घेण्यासाठी कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे यापुढे गोव्यात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊनच जावे लागेल.