नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीसाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत घरगुती उद्योगांना कामगार, प्रदूषण व उद्योग विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याची गरज लागणार नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ३ लाख घरगुती उद्योगांना फायदा होणार आहे.
सरकार जागतिक व्यासपीठावर भारतातील ईज ऑफ बिझनेसचा मुद्दा कायम ठेवत आहे. यापूर्वी दिल्लीत चालणार्या देशांतर्गत उद्योगांना सीलिंगपासून वाचवण्यासाठी सरकारने निर्णय घेतला होता की, ज्या छोट्या युनिट्सकडून प्रदूषण होत नाही त्यांना निवासी भागातही ते चालवता येईल. मात्र, यासाठी परवाना (लायसन्स) मिळवणे आवश्यक असेल. याशिवाय सरकारने छोट्या उद्योगांसाठीची नोंदणी फी देखील कमी केली आहे.
सरकारच्या या निर्णयांचा फायदा छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना होणार आहे. सरकारने पेटंट करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या फीमध्येही ६० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.