Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 4, 2023, 11:02 AM IST
Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली? title=
मोदींनी घटनास्थळावरुनच केला फोन

Odisha Train Accident PM Modi Visit Crash Site: ओडिशामधल्या (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बाहानगा येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातानांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) घटनास्थळाला भेट दिली. यावेळी मोदींनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर मदतकार्यासंदर्भातील आढावा घेतला. पंतप्रधान मोदींबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानही पंतप्रधानांबरोबर उपस्थित होते. या दोन्ही मंत्र्यांनी तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये मदत करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या टीमच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची आणि त्यानंतर मदतकार्याची सविस्तर माहिती दिली.

मोदी घटनास्थळी कोणाला भेटले?

पंतप्रधान मोदींनी घटनास्थळी ओडिशाच्या राजस्व आणि आपत्ती व्यवस्तापन मंत्री प्रमिला मलिक यांच्याबरोबर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. मोदींनी या दुर्घटनेनंतर या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्वव्रत करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहे यासंदर्भातील माहिती घेतली. यानंतर मोदींनी कटकमधील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. मात्र घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यावर मोदी हे त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या तंबूच्याबाहेर येऊन फोनवर कोणाशी तरी बोलतानाची दृष्य कॅमेरात कैद झाली. पंतप्रधान मोदी अपघात स्थळावरुन कोणाशी आणि काय बोलत होते यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर त्यांच्या फोनवर बोलत असल्याच्या फोटोबरोबर व्हायरल झाली. मात्र आता मोदींनी नेमका कोणाला फोन केला होता आणि त्यांनी फोनवर काय चर्चा केली यासंदर्भातील तपशील समोर आला आहे. 

कोणाला केलेला फोन?

पंतप्रधान मोदींनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर स्वत: दोन व्यक्तींना फोन केला. यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौवबा आणि दुसरी व्यक्ती होते केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी या दोघांनाही जखमी व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत तातडीने दिली जाईल यासंदर्भातील निर्देश दिले. तसेच अपघातामध्ये आपले नातेवाईक गमावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि सर्व मदत तसेच सोयीसुविधा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध होतील हे सुनिश्चित केलं जावं असंही मोदींनी या दोघांना सांगितलं अधिकारी म्हणाले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया आज (4 जून 2023 रोजी) बाहानगा येथे भेट देणार असून जखमींची भेट घेणार आहेत.

नक्की वाचा >> Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?

मोदींनी मानले त्या लोकांचे आभार

घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "रेल्वे अपघातासाठी दोषी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही माफ केलं जाणार नाही. जखमींना सर्वोत्तम उपचार दिले जातील," असं मोदींनी सांगितलं. यानंतर पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अपघातानंतर प्रवाशांना वाचवण्यासाठी आलेल्या स्थानिक लोकांचे आभार मानले आहेत. अनेक स्थानिकांनी अपघातानंतर ट्रॅककडे धाव घेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली. यापैकी अनेक स्थानिक तरुणांनी तर रात्रभर काम केलं. रात्री अडीच ते तीन वाजतानाही येथील स्थानिक रुग्णालयांबाहेर रक्तदान करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं होतं. "ट्रेन अपघातात जखमी झालेल्यांना मदत केलेल्या स्थानिकांचे मी आभार मानतो. मला झालेलं दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीत. देव आपल्याला या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्य देवो," असं मोदी म्हणाले.