चोरलेली OLA कॅब पोलिसांनी केली जप्त, दोन आरोपींना अटक

सध्याच्या काळात ऑनलाईन माध्यमातून कॅब बूक करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 14, 2017, 05:22 PM IST
चोरलेली OLA कॅब पोलिसांनी केली जप्त, दोन आरोपींना अटक title=
File Photo

नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाईन माध्यमातून कॅब बूक करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचत आहे.

अनेकजण ओला, उबर यासारख्या गाड्यांचा प्रवासासाठी वापर करत आहेत. मात्र, ओला गाडी लुटून आरोपींनी गाडीसह पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिल्लीमधून ओला कॅब लुटून पळालेल्या आरोपींना मेरठमधील मवाना परिसरात अटक करण्यात आली आहे. मेरठमध्ये पोलिसांनी आरोपींना शरण येण्यास सांगितलं. मात्र, आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात एका आरोपीला गोळी लागली तर इतर दोघांना पोलिसांनी अटक केली. तसेच आरोपींकडून ओला कारही जप्त करण्यात आली.

मेरठचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं की, ओला कॅब चोरल्याचा सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांना फोन आला. या कॅबमध्ये जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला होता. या ट्रॅकरच्या माध्यमातून चोरी झालेल्या गाडीचं लोकेशन शोधण्यात आलं.

चोरी झालेल्या गाडीचं लोकेशन मेरठ येथे दाखवत होतं. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचत आरोपींना गजाआड केलं. तर, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींकडून पोलिसांनी हत्यार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

आरोपींनी ही ओला कॅब आनंद विहार ते द्वारका जाण्यासाठी बुक केली होती. त्यानंतर आरोपी ग्राहक बनत गाडीत बसले. मग, काही अंतरावर गाडी गेल्यानंतर त्यांनी कॅब ड्रायव्हरला लुटत कार चोरी केली.