चितेला अग्नी देणार तितक्यातच त्यानं डोळे उघडले आणि...

दिल्लीत एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं. 

Updated: Dec 27, 2021, 12:39 PM IST
चितेला अग्नी देणार तितक्यातच त्यानं डोळे उघडले आणि...  title=

दिल्ली : एखादा मृत व्यक्ती जिंवत झाल्याची घटना तुम्ही ऐकलीये का? असं तुम्ही फक्त सिनेमामध्ये किंवा सिरीयलीमध्ये पाहिलं असेल...मात्र दिल्लीमध्ये अशीच काहीशी एक घटना घडली आहे. दिल्लीत एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं. मात्र अंतिम संस्कारापूर्वीच हा वृद्ध शुद्धीवर आला. या घटनेने तिथे उपस्थित सगळेच जण हैराण झाले.

वृद्धांच्या कुटुंबीयांची चूक?

या वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज करवून घेतलं. रुग्णालयातून या वृद्ध व्यक्तीला डिस्चार्ज देताना रुग्णालयाने डिस्चार्ज पेपरवर लेफ्ट अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाइस असं लिहिलं होतं.

व्हेंटिलेटरवरून काढल्यानंतर श्वास थांबला होता

या वृद्ध व्यक्तीला द्वारकामधील व्यंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वृद्ध व्यक्तीला कॅन्सरची लागण झाली होती. व्हेंटिलेटर परवडत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना घरी नेलं. व्हेंटिलेटरवरून काढल्यानंतर वृद्धाचा श्वासोच्छ्वास थांबला आणि त्यांचा मृत्यू झाला असं कुटुंबीयांना वाटलं.

या सर्व घटनेनंतर वृध्दाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आलं. मात्र जेव्हा चितेवर मृतदेह ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा श्वास सुरु असल्याचं लक्षात आलं.

पुन्हा रूग्णालयात केलं दाखल

वृद्ध शुद्धीवर आल्यानंतर 100 क्रमांकावर फोन करण्यात आला. यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.