मोदींचा पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का, ओम बिर्ला असतील नवे लोकसभा अध्यक्ष

लोकसभा अध्यक्षासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे होती चर्चेत.

Updated: Jun 18, 2019, 12:21 PM IST
मोदींचा पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का, ओम बिर्ला असतील नवे लोकसभा अध्यक्ष title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. राजस्थानच्या कोटा येथून खासदार असलेले ओम बिर्ला यांचं नाव लोकसभा अध्यक्षासाठी पुढे करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष कोण होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.

ओम बिर्ला यांची पत्नी अमिता बिर्ला यांनी म्हटलं की, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आम्ही कॅबिनेटचे आभारी आहोत.

लोकसभा अध्यक्ष पदासाठी अनेक वरिष्ठ खासदारांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार हे दिग्गज होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्ष कोण होणार या चर्चाला आता पूर्णविराम लागला आहे.

राजस्थानच्या कोटा येथून भाजप खासदार असलेले ओम बिर्ला हे आता लोकसभेचे नवे अध्यक्ष असणार आहेत. ओम बिर्ला हे आज आपला अर्ज दाखल करतील. बुधवारी ससंदेत लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान होईल. एनडीएकडे बहुमत असल्याने त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची पूर्ण शक्यता आहे.