जयपूर : 21 व्या शतकात आजही कितीही विचारांनी पुढे गेलं असं जरी आपण म्हणत असलो तरी काही प्रमाणात हुंडा प्रथा अजूनही बंद झाली नाही. आजही अनेक छोट्या गावांमध्ये कळत नकळत हुंडा प्रथा सुरू आहे. ह्या हुंड्यासाठी कित्येक स्त्रियांच्या जीवावरही सासरचे लोक उठल्याचे प्रकार समोर आले आहेत. आताही एक अशीच हृदयद्रावक घटना समोर आली.
एकाच कुटुंबातील एक महिला आणि दोन गर्भवती बहिणींसह दोन मुलांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली. ही हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तीन बहिणी आहेत. यापैकी दोघी गर्भवती होत्या. त्यांच्यासोबत दोन लहान मुलंही होती. बाजारात जाण्याच्या निमित्ताने त्यांनी घर सोडलं पण घरी परतल्याचं नाहीत. याबाबत कुटुंबातील लोकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर काही तासांनी हा प्रकार समोर आला.
या प्रकरणी पोलिसांनी तीन मृत बहिणींच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहेत. तर माहेरच्यांनी या तीन बहिणींची हत्या केल्याचा आरोप आहे. तीन बहिणींपैकी एकीनं Whatsapp वर स्टेटस ठेवलं होतं.
मृत महिलेनं Whatsapp वर हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलेलं बरं असं स्टेटस ठेवल्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 3 बहिणींची एकाच कुटुंबात लग्न नकळत्या वयात लावली होती. त्यानंतर हुंड्यासाठी तगादा लावण्यात आल्याचा सासरच्या मंडळींवर आरोप आहे.
या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. नक्की हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस सखोल चौकशी करून तपास करत आहेत. Whatsapp स्टेटस ठेवल्याने पोलिसांनी या घटनेला प्राथमिकता आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. ही धक्कादायक घटना जयपूरमधील असल्याची माहिती मिळाली आहे.