Omicron ची दहशत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

गेल्या रविवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर आता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 1, 2021, 05:45 PM IST
Omicron ची दहशत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron variants) भीती सर्व जगात दिसून येत आहे. अनेक देशांनी आतापासून उपाययोजना सुरु केल्या आहेत. जेणेकरुन देशात या विषाणूला येण्यापासून रोखता येईल. भारताने ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) यास दुजोरा दिलाय.

डीजीसीएने असेही नमूद केले आहे की, ते योग्य वेळी याबाबतचा निर्णय कळवतील. गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारने जाहीर केले होते की 15 डिसेंबरपासून भारतात व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) पुन्हा सुरू होतील. 20 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

गेल्या रविवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर मात्र आता हा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. सरकारने ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला. कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला.

नागरी विमान वाहतूक नियामक संस्थेने जारी केलेल्या नोटीसद्वारे, आज पुष्टी झाली की केंद्र सरकार व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या योजनेला सध्या ब्रेक लावत आहेत. 

डीजीसीएच्या कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, नवीन प्रकाराने चिंता वाढवल्याने आणि जागतिक परिस्थिती पाहता, सर्व संबधितांसोबत सल्लामसलत करून परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. सुरक्षित स्थिती आढळल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कोरोनामुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून भारतात आणि भारतातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांचे संचालन स्थगित केले. देशात आणि परदेशात कोरोनाचा कमी होत चाललेला कहर लक्षात घेता, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नुकतेच आपल्या आदेशात म्हटले होते की, गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार आणि आरोग्य मंत्रालय अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.