बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे ६० वर्षीय रुग्णास खाटेला बांधले

घडल्या प्रकरणी वृद्धाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.  

Updated: Jun 7, 2020, 11:11 AM IST
बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे ६० वर्षीय रुग्णास खाटेला बांधले  title=

नवी दिल्ली : माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट मध्य प्रदेशातील शाजापूर येथे घडली आहे. एका खासगी रुग्णालयात ६० वर्षीय वृद्ध रुग्णास खाटेला बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून वृद्धाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणावरून वृद्धास बांधून ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या मुलीने केला आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे. रुग्णासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रुग्णालय प्रशासनाने सर्व आदेश फेटाळून लावले आहेत. रुग्णाला अत्यंत त्रास होत असल्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता अशी प्रतिक्रिया रुग्णालयाने दिली आहे. 

याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दोषींना सोडणार नाही असा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. ते म्हणाले 'शाजापूर एका रुग्णालयात वरिष्ठ रुग्णासोबत केलेली गैरवर्तवणूक अत्यंत घृणास्पद आहे. दोषींना माफी मिळणार नाही. त्यांच्यवर कडक कारवाई करण्यात येईल.' असं देखील ते म्हणाले. 

पोटासंदर्भात आजार बळावल्यामुळे ६० वर्षीय लक्ष्मीनारायण दांगी यांना १ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास बरा झाल्यामुळे ते रुग्णालयातून घरी जाण्यासाठी तया होते. परंतु रुग्णालयाने आकारलेले बिल भण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे मुलगी सीमा दांगीने सांगितले. त्यानंतर  ६० वर्षीय रुग्णास खाटेला बांधून ठेवण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.