कांद्याचे भाव वाढतायत, पण शेतकरी दादाच्या हातात पैसा लागत नाहीय

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी या सर्व ठिकाणी उत्पादन खूप कमी झाले आहे.

Updated: May 10, 2021, 10:35 PM IST
कांद्याचे भाव वाढतायत, पण शेतकरी दादाच्या हातात पैसा लागत नाहीय title=

नाशिक : रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे, त्यामुळे कांदा काढणीला आला आहे, दरवर्षी मे महिन्यात कांद्याचे भाव सर्वात कमी झालेले असतात. मात्र या वर्षी कांद्याचे भाव मात्र जास्त आहेत. सध्या रिटेल दरात कांद्याची किंमत 25 रुपये किलो आहे. सर्वाधिक कांदा उत्पादक महाराष्ट्र राज्यात घाऊक कांद्याची किंमत सध्या 1100 ते 1500 रुपये क्विंटल सुरू आहे. तर मागील वर्षी याच काळात कांद्याची सरासरी किंमत केवळ 400 ते 600 रुपये क्विंटल होती. याचे प्रमुख कारण म्हणजे उत्पादनाचा अभाव. घाऊक दरात देखील शेतकर्‍यांना विशेष असा लाभ मिळत नाही, कारण शेतकऱ्यांना कांद्याच्या शेतीचा खर्च सुमारे 16 रुपये प्रति किलो मागे येतो.

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक भारत दिघोले म्हणाले की, यंदा खराब बियाणे, उशीरा झालेली पेरणी, पाऊस आणि गारपिटीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दरवर्षी 1 एकरवर सरासरी 16 टन उत्पादन मिळते, परंतु यावेळी केवळ 10 ते 13 टन सरासरी उत्पादन मिळाले आहे. जर पीकच कमी असेल तर किंमतीत वाढ होणे निश्चित आहे.

कांद्याची किंमत किती?

दिघोले यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने 2017 मध्ये सांगितले होते की, कांद्याच्या उत्पादनासाठी प्रति किलो 9.34  रुपये खर्च येतो. चार वर्षांत ती लागवडीची किंमत वाढूण 15 ते 16 रुपये किलोपर्यंत झाली आहे. त्यामुळे अजूनही शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाहीत किंवा जमिनही भाड्याने मिळत नाही.

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, धुळे आणि सोलापूर जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यावर्षी या सर्व ठिकाणी उत्पादन खूप कमी झाले आहे.

शेतकर्‍यांना लाभ का मिळत नाहीत?

सर्व शेतकर्‍यांना घरी कांदा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यांच्यावर इतका आर्थिक दबाव असतो की, त्यांचे पीक शेताबाहेर येताच त्यांना ते बाजारात आणावे लागते. जर अनुमान लावलायचा झाला तर, समजा एखाद्या गावात 100 शेतकरी आहेत, तर 100 शेतकऱ्यांमागे फक्त 10 लोकांकडेच साठा करायला जागा असते.

शेतकऱ्यांना स्टोअर तयार करण्यासाठी सरकारने दिलेली मदत देखील तोकडी पडत आहे. 25 टन स्टोरेजसाठीची किंमत 4 लाख रुपये आहे. तर राज्य सरकार केवळ यासाठी 87 हजार 500 रुपये देते आहे. 2 हजार शेतकर्‍यांनी जर स्टोअरसाठी अर्ज केला तर लॅाटरीमध्ये फक्त 100 शेतकऱ्यांना स्टोअर मिळतो. त्यामुळे स्टोअर नसल्याने शेतकरी स्वस्त दरात पीक विकायला भाग पडतात.

भारतात कांद्याचे उत्पादन

महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थान हे कांदा उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहेत.
देशातील कांद्याचे वार्षिक उत्पादन सरासरी 2.25 ते 2.50 कोटी मेट्रिक टन आहे.
दर वर्षी किमान 15 दशलक्ष मेट्रिक टन कांदा विकला जातो.
सुमारे 10 ते 20 लाख मेट्रिक टन कांदा साठवणी दरम्यान खराब होतो.
2020-21 मध्ये कांद्याचे उत्पादन 26.09 मिलियन टन होण्याचा अंदाज आहे.