नोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज

गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत.

Updated: May 9, 2020, 08:05 AM IST
नोकरीसाठी देशातील मजुरांची आता 'या' राज्याला पसंती; परवानगीसाठी एक लाख अर्ज title=

मुंबई: आतापर्यंत देशभरात महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईची प्रत्येकाच्या हाताला काम देणारे शहर म्हणून ओळख होती. मात्र, लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प झाल्यानंतर हे चित्र झपाट्याने बदलत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह संपूर्ण राज्यातून मजुरांचे तांडेच्या तांडे बाहेर पडताना दिसत आहेत. यामध्ये मोठयाप्रमाणावर उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. या मजुरांना आता पोटापाण्यासाठी हरियाणा आकर्षित करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जवळपास १.०९ लाख मजुरांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून हरियाणात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. 

देशातील इतर भागांच्या तुलनेत हरियाणात कोरोनाचा प्रभाव फारच कमी आहे. आतापर्यंत हरियाणात कोरोनाचे केवळ ६४७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी १४ जण इटालियन नागरिक आहेत. तर २७९ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. हरियाणात कोरोनामुळे केवळ आठच मृत्यू झाले आहेत. 

Lockdown-2 : एक वर्षाच्या बाळाला घेऊन जोडप्याचा सायकलने प्रवास

त्यामुळे हरियाणातील लॉकडाऊनचे निर्बंध बरेच शिथील झाले आहेत. त्यामुळे गुरगाव, फरिदाबाद, पानिपत, सोनिपत, झझ्झर, यमुनानगर आणि रेवारी यासारख्या परिसरातील औद्योगिक वसाहती आणि कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेश आणि बिहारमधील मजूर आता हरियाणाच्या दिशेने धाव घेत आहेत. हरियाणाचे प्रधान सचिव अनुराग रस्तोगी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, स्थलांतरित मजुरांना हरियाणात यायचे असेल तर आम्ही जरुर त्यांची व्यवस्था करु. 

तर हरियाणा प्रशासनातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानेही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक मजुरांना हरियाणात यायचे असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्यंतरी राज्यातून बाहेर गेलेल्या मजुरांना आता लॉकडाऊनमुळे राज्यात पुन्हा येण्यात अडचणी येत आहेत. गावी गेलेल्या या मजुरांच्या हाताला काहीही काम नाही. तर दुसरीकडे हरियाणात दुकाने आणि औद्योगिक वसाहती सुरु झाल्याने याठिकाणीही मनुष्यबळाची कमी भासत आहे. त्यामुळे अनेक मालक या मजुरांना फोन करून बोलावून घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्जांचे प्रमाण वाढल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.