न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर चिदंबरम म्हणाले....

न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली असून त्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवले जाईल. 

Updated: Sep 5, 2019, 07:38 PM IST
न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर चिदंबरम म्हणाले.... title=

नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात होणार आहे. 

न्यायालयाच्या या निकालानंतर प्रसारमाध्यमांनी पी.चिदंबरम यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा मला फक्त अर्थव्यवस्थेची चिंता वाटते, असे सांगून पी. चिदंबमरम निघून गेले. 

दरम्यान, तिहार तुरुंगात रवानगी झाल्यानंतर सुरक्षेसाठी आपल्याला स्वतंत्र कोठडीत ठेवावे, अशी विनंती पी.चिदंबरम यांनी केली होती. तसेच जेल प्रशासनाकडून आपल्याला आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाव्यात, असेही चिदंबरम यांनी म्हटले होते. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली असून त्यांना स्वतंत्र कोठडीत ठेवले जाईल. 

पी.चिदंबरम यांची १५ दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी दिल्लीच्या रोझ अव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने चिदंबरम यांना कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्याला विरोध दर्शवला. मात्र, न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद उचलून धरत १९ सप्टेंबरपर्यंत पी.चिदंबरम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. 

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही जामीनासाठी चिदंबरम यांनी केलेला अर्ज फेटाळून लावला. आज सीबीआयच्या कोठडीची मुदत संपत असल्याने ईडीचा चिदंबरम यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी ईडीच्या अटकेआधी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने या अर्जाला केराची टोपली दाखवली. 

जर चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला असता तर विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी, शारदा चिट फंड, टेरर फंडिंग यासारख्या खटल्यावर याचा थेट परिणाम होईल, असा युक्तिवाद सॉलिसिटर तुषार मेहता यांच्याकडून करण्यात आला. चिदंबरम यांना जामीन मंजूर केल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे तपासात अडथळे येतील, असेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.