काश्मीरमध्ये घातपातासाठी पाकिस्तानकडून ६० अफगाणिस्तानी दहशतवाद्यांची आयात

२४ ते २८ तासांच्या अंतराने या तुकड्या विविध मार्गांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी रवाना होतील

Updated: Sep 25, 2019, 10:24 PM IST
काश्मीरमध्ये घातपातासाठी पाकिस्तानकडून ६० अफगाणिस्तानी दहशतवाद्यांची आयात title=

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर घातपाती हल्ले करण्यासाठी पाकिस्तानकडून ६० कडव्या अफगाणिस्तानी दहशतवाद्यांची भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या तुकड्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या विविध दहशतवादी संघटनांमधून ४० ते ६० दहशतवाद्यांची निवड केल्याचे समजते. पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'च्या माध्यमातून या सगळ्यांची निवड झाली आहे. 

'एएनआय' वृत्तसंस्थेला यासंदर्भातील काही कागदपत्रेही मिळाली आहेत. यामध्ये डझनभर दहशतवादी आत्मघातकी जॅकेट किंवा शस्त्रे वापरून घातपात करणार असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या युद्धप्रवण क्षेत्रात या सर्वांनी खडतर प्रशिक्षण घेतलेले आहे. यानंतर खैबर पख्तुनवा प्रांतात पाकिस्तानी सैन्याकडूनही त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांना सीमेलगतच्या वेगवेगळ्या लाँचपॅडवर (तळ) पाठवण्यात आल्याचे समजते. 

साधारण २१ सप्टेंबरनंतर हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी आपापल्या तळावरून बाहेर पडतील. त्यासाठी दहशतवाद्यांच्या लहानलहान तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. २४ ते २८ तासांच्या अंतराने या तुकड्या विविध मार्गांनी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी रवाना होतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बहावलपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या बैठकीत अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना भरती करण्याचा निर्णय झाला. जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणे हेच या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहितीही समोर आली आहे. 

या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षादलांना संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करणे सोपे जावे, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. पुन्हा अशाप्रकारच्या हालचाली दिसल्यास सुरक्षादलांनी तातडीने एकमेकांना माहिती पुरवावी, असेही आदेशात म्हटले आहे.