श्रीनगर : लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे. अबु दुजानाचं पार्थिव ताब्यात घ्यावं यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना संपर्क साधला. मात्र पाकिस्ताननं दुजानचा मृतदेह स्विकारायला नकार दिला. त्यानंतर एका अज्ञात स्थळी दुजानच्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.
दरम्यान चकमकीत अबु दुजानाला मंगळवारी ठार मारल्यानंतर फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंदचं आव्हान दिलं होतं. श्रीनगरसहित जम्मू काश्मीरमधल्या अनेक संवेदनशील ठिकाणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी भविष्यात सुरक्षा यंत्रणांवर दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा इशारा दिला आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी महत्त्वाच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची योजना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तयार केली आहे. यामध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणा-या अबू इस्माईलचाही समावेश आहे.