चंदीगड : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या ५० वर्षीय बाबा राम रहीमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसेत ३० जणांचा बळी गेलाय. यानंतर हरियाणा सरकारनं बुधवारी पंचकुलाचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अशोक कुमार यांना निलंबित केलंय.
बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि हिंसा केली. सरकारी कार्यालयं जाळली.
हरियाणातलं हे हिंसेचं लोण पंजाबमध्येही पसरलं. पंजाबमधील दोन रेल्वे स्टेशन्स पेटवून दिली तर अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयांचीही तोडफोड केलीय. अनेक चॅनल्सच्या ओबी व्हॅनही फोडण्यात आल्या आहेत.
हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसंच अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. मात्र राम रहीमच्या समर्थकांनी अग्नितांडव सुरू केला त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या नुकसानीची भरपाई बाबा राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाकडून करण्यात यावी असे आदेश पंजाब-हरियाणा हायकोर्टानं दिले आहेत.
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हिंसाचार प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हटलंय. सीबीआय कोर्टानं बाबा गुरमित राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या भक्तांनी दोन तास पंचकुलाच्या रस्त्यांवर नंगानाच घातल्यानंतर खट्टर यांच्यावर टीका होऊ लागलीये. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय.