नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वी पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याला एक जोरदार झटका लागला आहे.
हार्दिक पटेलला हा झटका सत्ताधारी भाजपने दिला आहे. हार्दिक पटेलचे दोन समर्थक हे भाजपच्या गळाला लागले आहेत. यामध्ये वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांचा समावेश आहे. हे दोघेही जवळपास ४० समर्थकांसोबत भाजपमध्ये सहभागी झाले.
वरुण पटेल आणि रेश्मा पटेल या दोघांनी गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेलही यावेळी तेथे उपस्थित होते.
#UPDATE Patidar leaders Reshma Patel and Varun Patel join BJP #GujaratElections2017
— ANI (@ANI) October 21, 2017
एकीकडे काँग्रेस पक्षाने हार्दिक पटेलला निवडणूक लढण्याची ऑफर दिली तर दुसरीकडे त्याच्या दोन समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलचा काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याच्या प्रश्नावर गुजरात काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं की, हार्दिक पटेलने काँग्रेसला समर्थन देण्याची आमची इच्छा आहे.
हार्दिक पटेलला ज्या ठिकाणाहून निवडणूक लढायची आहे त्या ठिकाणाहून आम्ही तिकिट देण्यास तयार आहोत असेही गुजरात काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं आहे. तर, हार्दिक पटेलने म्हटलं आहे की, मी निवडणूक लढणार नाही कारण, घटनात्मकदृष्ट्या मी निवडणूक लढवू शकत नाहीये.