आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात कोरोना रुग्णांविषयी मोठी माहिती उघड

ही आकडेवारी नक्की वाचा...   

Updated: Apr 29, 2020, 07:47 AM IST
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात कोरोना रुग्णांविषयी मोठी माहिती उघड  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : सोमवारपर्यंत Coronavirus कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचं प्रमाण पाहता ही आकडेवारी २१,६३२ इतकी होती. या रुग्णांपैकी अवघ्या ८० रुग्णांनाच व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याची बाब समोर आली. दैनंदिन स्तरावर केल्या जाणाऱ्या निरिक्षणातून ही बाब उघड झाली आहे. 

काही राज्यांमध्ये प्लाझ्मा थेरेपीला सुरुवात झाली आहे. पण, मंगळवारी आरोग्य मंत्रालयाच्या इशाऱ्यानुसार अशा कोणत्याही उपचार पद्धतीचे पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनावर उपचार करतेवेळी कोणत्याही शिष्टाचार आणि नियमांचं उल्लंघन करु नये. नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलंच पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलं. 

आतापर्यंत जवळपास साडेसात लाख कोरोना चाचण्या केल्या असून, या चाचण्यांचा वेग वाढवण्याचा मानस असल्याचं स्पष्ट होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातील आकडेवारीनुसार रविवारपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह आणि क्रावंटाईनमध्ये असणाऱ्यांपैकी २.१७ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात म्हणजेच आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे तर, १.२९ रुग्णांना ऑक्सिजनचा आधार घ्यावा लागत आहे. ज्यामध्ये ०.३६ टक्के रुग्णांनाच व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. ही सर्व आकडेवारी पाहता रुग्ण कोरोनातून सावरण्याचं प्रमाण हे २३.३ टक्के इतकं आहे. 

 

सूत्रांचा हवाला देत इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दर दिवशी किमान १०-१५  व्हेंटिलेटरची गज भासते. सध्या ८० रुग्णांना अशी मदत घ्यावी लागत आहे. भारत आणि युरोपातील ही परिस्थिती बरीच वेगळी आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि सद्ययस्थितीविषयीची ही माहिती पाहता आरोग्य विभागाच्या नियंत्रणातच ही परिस्थिती असल्याचं कळत आहे. लॉकडाऊनचं पूर्णत: पालन आणि स्वयंशिस्त पाळली गेल्यास देश कोरोनातून बऱ्याच अंशी सावरु शकतो हाच मुद्दा इथे अधोरेखित होत आहे.